चर्चा मंत्रिपदाची ; मिळाले प्रवक्ते अन् कार्याध्यक्षपद
महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा वर्षभर झाली; परंतु...
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत सलग दोनवेळा नवख्या उमेदवारांकडून पराभूत झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलीचे काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती.मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम राखत विजयाची हॅट्ट्रिक साधली. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा वर्षभर झाली. परंतु 2020-21 हे वर्ष चर्चेतच सरले. आता नव्या वर्षात पक्षश्रेष्ठींकडून त्यांना मंत्रिपद मिळणार, की प्रदेश प्रवक्ता आणि कार्याध्यक्ष याच पदावर समाधान मानावे लागणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
बहुभाषिक, बहुधर्मीयांचा मतदारसंघ म्हणून शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. बहुतेक कामगार वर्ग असलेल्या मतदारसंघात कॉंग्रेसचे सर्वाधिक वर्चस्व आहे. परंतु, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील कॉंग्रेसचे नाराज झालेले ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यू. एन. बेरिया यांनी आमदार प्रणितींना साथ दिली. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा या वर्षभरात रंगली. या मतदारसंघातील 'एमआयएम'मध्ये फूट पडली आणि बहुतेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतदारसंघातील पकड, सर्वसामान्यांचा जनाधार कमी होणार नाही, याची दक्षता आमदार प्रणितींनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून घेतली. तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी शहरातील तरुणांच्या रोजगाराचा, शिक्षणाबरोबरच कोरोना काळातील नियम मोडल्याने तरुणांवरील गुन्हे मागे घ्या, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काची घरे द्यावीत, घरकुल अनुदानात वाढ करावी, अशा मुद्द्यांना स्पर्श केला. त्याचे सर्वत्र कौतुक झाले. दरम्यान, कॉंग्रेसमधील नाराजांचा वेध घेऊन त्यांची नाराजी दूर करणे, पक्षसंघटन अभेद्य राहील याकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. त्यामुळे माजी महापौर नलिनी चंदेले , माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीत दाखल झाले. नगरसेविका श्रीदेवी फुलारी, प्रिया माने यांनीही पक्षाचे काम सोडून दिल्याचे शहराध्यक्षांनी स्वत: स्पष्ट केले.
रक्त अन् भक्तांचीच रंगली चर्चा
शहरातील एका कार्यक्रमादरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी रक्त आणि भक्तांमुळेच सोलापूरची वाट लागली, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा जिल्हाभर निषेध व्यक्त होत असतानाच, त्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उडी घेतली. एकाने धर्माच्या नावावर तर दुसऱ्याने जातीच्या नावावर लोकसभा निवडणूक लढविली म्हणत त्यांनी भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. त्याचे पडसाद अजूनही उमटत असून त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसू शकतो, अशी चर्चाही सुरू झाली.
25 वर्षांनंतर बदलला जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादीच्या बरोबरीने माळशिरस तालुक्यात कॉंग्रेसची ताकद वाढावी या हेतूने तालुक्यातील प्रकाश पाटील यांना कॉंग्रेसने जिल्हाध्यक्षपदी संधी दिली. याच मतदारसंघातील रामहरी रूपनवर यांनाही आमदारकी दिली. मात्र, आता रूपनवर यांची मुदत संपली तर प्रकाश पाटलांनाही पदावरून पायउतार व्हावे लागले. हा समतोल राखण्यासाठी जवळपास 25 वर्षांनंतर कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलला आणि माळशिरस मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद नसतानाही पक्षाने डॉ. धवलसिंह मोहिते- पाटलांना जिल्हाध्यक्षपद दिले. त्यांनी जिल्हाभर दौरे करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला, परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य लाभले नाही. तर विधान परिषदेची आमदारकीही कोणाला न मिळाल्याने अनेकजण नाराज असल्याचीही चर्चा आहे.
कॉंग्रेस भवनासमोरच शेतकऱ्यांचा ठिय्या
माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम न दिल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रश्न सुटेल म्हणून सोलापुरातील कॉंग्रेस भवनासमोरच दिवाळीपूर्वी ठिय्या मांडला. परंतु, अनेकांनी त्या शेतकऱ्यांना म्हेत्रे यांच्या घरासमोर किंवा कारखान्यावर आंदोलनाचा सल्ला दिल्याचे त्यावेळी बोलले गेले. शेवटी म्हेत्रेंनीच एफआरपीची जुळवाजुळव करून आंदोलनाचा तिढा सोडविला. तत्पूर्वी, दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागल्यानंतर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह पदाधिकारी, काही मोजक्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला. त्यावेळी कॉंग्रेस भवनासमोर शेतकरी आंदोलन सुरू असल्याचा त्यांना विसर पडल्याचीही चर्चा झाली.
0 Comments