google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या राष्ट्रवादीत पवारांचे थेट लक्ष ! नवे वर्ष लाभदायक ठरणार ?

Breaking News

सोलापूरच्या राष्ट्रवादीत पवारांचे थेट लक्ष ! नवे वर्ष लाभदायक ठरणार ?

 सोलापूरच्या राष्ट्रवादीत पवारांचे थेट लक्ष ! नवे वर्ष लाभदायक ठरणार ?


2021 च्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात थेट लक्ष घातले असल्याचे प्रकर्षाने जाणवले.


सोलापूर : सरते वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी  अडचणीचे ठरले.2021 च्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार  यांनी सोलापूर शहराच्या  राजकारणात थेट लक्ष घातले असल्याचे प्रकर्षाने जाणवले. माजी महापौर महेश कोठे , एमआयएम  नगरसेवक तौफिक शेख, सुधीर खरटमल , माजी महापौर नलिनी चंदेले  



यांनी राष्ट्रवादीच्या कामाला सुरुवात केली आहे. माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया , नगरसेवक आनंद चंदनशिवे  वेटिंगवर आहेत. वेटिंगवर असलेल्यांसह नव्या वर्षात इतर पक्षातील अनेक जुने चेहरे राष्ट्रवादीत दिसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 2022 हे राष्ट्रवादीसाठी लाभदायक ठरण्याची शक्‍यता आहे.




सोलापुरात कोरोना  महामारीचा संसर्ग वाढला आणि पालकमंत्रिपदाची धुरा दत्तात्रय भरणे  यांच्यावर आली. त्यांच्या पालकमंत्रिपदाचा निम्म्याहून अधिक कालावधी हा कोरोना महामारीशी सामना करण्यात गेला. त्यातच इंदापूर तालुक्‍यातील सिंचन योजनांसाठी उजनीतून  पाच टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचा मुद्दा समोर आला. या मुद्‌द्‌यामुळे गेल्या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि पालकमंत्री भरणे दोघेही विरोधी पक्षाच्या टीकेचे धनी झाले. 



कोरोना आणि इंदापूरच्या पाण्याच्या विषयाने पालकमंत्री हटाओ, उजनीचे पाच टीएमसी पाणी बचाव अशा मोहिमा राबविण्यात आल्या. नंतरच्या काळात इंदापूरच्या पाण्याचा विषय राज्य शासनाकडून रद्द करण्यात आला. कोरोनाचेही संकट कमी झाले. त्यामुळे 2021 च्या शेवटच्या महिन्यात पालकमंत्री भरणे व राष्ट्रवादी यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण होण्यास सुरुवात झाली.



कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले निकष सोलापुरात पूर्ण होत नसल्याने सोलापूरची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीला महत्त्वाच्या निवडणुकांचा सामना करावा लागला नाही. 



आगामी वर्षात या निवडणुका होण्याची शक्‍यता असल्याने झालेला चुका टाळण्याची व सुधारण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली आहे. नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, दूध संघ, विधानपरिषद यासह महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमधील कामगिरीसाठी राष्ट्रवादी सध्या मोर्चेबांधणी करू लागली आहे.



पंढरपुरात निसटता पराभव

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके  यांच्या निधनानंतर झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला. ही निवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. राज्यातील नेते, जिल्ह्यातील नेते पंढरपुरात तळ ठोकून होते. राष्ट्रवादीचा हा पराभव गेल्या वर्षातील महत्त्वाची घटना मानली जात असून, या पराभवाचे पडसाद पंढरपूर व मंगळवेढ्याच्या राजकारणात उमटत आहे.

Post a Comment

0 Comments