डाळिंब संशोधन केंद्र उभारले कशासाठी?; शेतकऱ्यांचा सवाल
सांगोला : सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. परंतु, या डाळिंब संशोधन केंद्राचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदाच होत नसल्याने या डाळिंब संशोधन केंद्राची ’असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.
डाळिंबावरील तेल्या, मर व इतर रोगामुळे डाळिंब उत्पादक मेटाकुटीला आला आहे. मात्र, संशोधन केंद्राला यावर अद्याप उपाय सापडलेला नाही. त्यामुळे डाळिंब संशोधन केंद्राचा उपयोग काय, असा प्रश्र्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सांगोला तालुका हा डाळिंबाचा आगार म्हणून नावारूपाला आला आहे. तालुक्यात जवळजवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. परंतु ज्या डाळिंबमुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा झाली, शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान उंचावले. त्याच डाळिंबावरील विविध रोगांमुळे दिवसेंदिवस डाळिंबाचे क्षेत्र घटू लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातून डाळिंबाचे उत्पादन होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात डाळिंब संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली. परंतु, डाळिंब संशोधन केंद्र जिल्ह्यात असूनही डाळिंबाच्या विविध रोगांवर ठोस असे उपाययोजना होत असल्यामुळे डाळिंब उत्पादक मात्र त्रस्त झाला आहे.
मर रोगाने डाळिंब क्षेत्र घटू लागले
डाळिंबावरील मर रोगांमुळे तालुक्यातील डाळिंब क्षेत्र घटू लागले आहे. मर रोगाने डाळिंबाचा बहार धरण्याअगोदर आणि धरल्यानंतर डाळिंबाची झाडे वाळून जातात. तसेच त्या क्षेत्रामध्ये लवकर डाळिंब लागवड ही करता येत नाही. लागवड करून बहार धरेपर्यंत दोन ते तीन वर्षाचा काळ जात असल्याने व काही बागा बहार धरायचे अगोदरच मर रोगांमुळे बागा वाळून जात असल्याने सुद्धा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ठळक बाबी
डाळिंब उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनामुळे परकीय चलनात वाढ
तेल्या, मर रोगाने उत्पादक हैराण
डाळिंब संशोधन केंद्राचा सामान्य उत्पादकांना नाही फायदा
डाळिंब रोगांवर ठोस उपारयोजना व्हावी
"सांगोला तालुका आणि डाळिंब हे समीकरण अधिक घट्ट झालेले आहे. डाळिंबावरील विविध समस्यांमुळे डाळिंब उत्पादक अडचणीत सापडला आहे. कोरोनासारख्या रोगावर लस मिळू शकते तर वर्षानुवर्षे डाळिंबावर तेल्या, मर रोगावर उपाययोजना का होऊ शकत नाही. डाळिंबावरील समस्येबाबत तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांना घेऊन डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांबरोबर लवकरच बैठक घेऊन समस्येबाबत विचारविनिमय करण्यात येईल."
- डॉ. बाबासाहेब देशमुख (स्व. गणपतराव देशमुखांचे नातू)
0 Comments