दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनांच मिळणार कॉलेजमध्ये प्रवेश
सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कातून वाढणार नाही, याची दक्षता टास्क फोर्सकडून घेतली जात आहे. दिवाळीनंतर महाविद्यालये ऑफलाइन पध्दतीने सुरु होणार आहेत. तत्पूर्वी, सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण कॅम्पही आयोजिले आहेत.तरीही, लस टोचून न घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा निर्णय होऊ शकतो, असे उच्च शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून उघडली आहेत. दुसरी लाट ओसरल्यांनतरही तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे कोवॅक्सिन असो वा कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना ८४ दिवसांनी दुसरा डोस घेतल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. तर कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस टोचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवून त्यांना लस टोचून घ्यावी, असे मेसेज विद्यापीठाने पाठविले आहेत. 'मिशन युथ हेल्थ'अंतर्गत आता विद्यापीठांसह बहुतेक महाविद्यालयांमध्ये १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना लस टोचण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
पुढील परीक्षाही ऑनलाइन की ऑफलाइन?
राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक आहे. डिसेंबरमध्ये या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा होईल. एवढ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार नाही. कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे संपलेली नसून बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रतिबंधित लसही टोचून घेतलेली नाही. त्यामुळे पुढील सत्र परीक्षेसाठी ऑफलाइन की ऑनलाइन, या दोन्ही पर्यायाचा विचार उच्च शिक्षण मंत्रालयाकडून सुरु आहे. प्रतिबंधित लस टोचलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यावेळची कोरोनाची स्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.
१८ वर्षांवरील प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये बसता येणार आहे. ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास दोन्ही डोस न घेतलेल्यांना अडचण येऊ शकते.
- डॉ. महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
0 Comments