भाऊबीज करुन परतताना काळाचा घाला ; भाऊ - बहिणीने जागीच सोडला जीव
जत : दरिकोणूर (ता. जत) हद्दीत एका क्रुझर चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दोघा सख्या बहिनी भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्षय श्रीमंत चौगुले (वय 22) व काजल श्रीमंत चौगुले ( वय 17, दरिबडची, ता.जत) असे मृत्यू भाऊ- बहिणीचे नाव असून शनिवारी दि.6 रोजी सायंकाळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात अंकूश श्रीमंत चौगुले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी चालक नारायण लक्ष्मण दिनकर (रा.कल्लोळ, ता. चिक्कोडी, जि.बेळगाव) याच्या विरोधात भरधाव वेगाने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी सह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी भाऊबीज हा भाऊ बहिनीच्या पवित्र नात्यांचा दिवस होता. यानिमित्ताने अक्षय व लहान बहिन काजल हे दोघेही (एम.एच.13 एयु. 6501) या दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील व्हळ गावी मोठ्या बहिनीकडे भाऊबीज साठी गेले होते. तेथून परत येत असता घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर दरिकोणूर ते गुड्डापूर रोडवर दरिकोणूर जवळ कर्नाटकातील चिक्कोडी हून गुड्डापूर येथे दर्शनासाठी जात असलेल्या (के.ए.46.1514) या क्रुझर चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने दोघा बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी जत ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. अधिक तपास सहायक पोलिस फौजदार काकासो रूपनर हे करत आहेत.
0 Comments