Solapur : बापानेच केला मुलाचा खून ! अक्कलकोट तालुक्यातील घटना
शेत विकून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये द्या, या कारणावरून वडील व मुलामध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान मुलाच्या खुनात झाले.संशयित आरोपी वडिलाने मुलाच्या डोक्यात व पाठीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केला. हा खून 30 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता राहत्या घरी झाला. याची दक्षिण पोलिस (Police) ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेची फिर्याद मृताचा भाऊ मंगलदास राजेंद्र जानकर (वय 20, रा. कल्लप्पावाडी, तालुका अक्कलकोट) याने दिली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव रघुनाथ राजेंद्र जानकर (वय 28, रा. कल्लाप्पावाडी, तालुका अक्कलकोट) असे आहे. संशयित आरोपीचे नाव राजेंद्र रघुनाथ जानकर (वय 49, रा. कल्लप्पावाडी, तालुका अक्कलकोट) असे आहे. फिर्यादी व मृत व्यक्ती हे दोघे भाऊ असून संशयित आरोपी हे दोघांचे वडील आहेत. फिर्यादीचा भाऊ रघुनाथ राजेंद्र जानकर याने वडिलास शेती विकून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये द्या, असे म्हटल्यावर वडिलाने, मी शेती विकून पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हटल्यावर मुलगा रघुनाथ याने वडिलाची कॉलर पकडली. वडिलाने मुलाला ढकलून दिले. मुलगा खाली पडल्यावर बाजूला असलेली कुऱ्हाड वडिलाने हातात घेऊन मुलाच्या डोक्यात व पाठीवर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये मुलाचा जीव गेला.
या खुनाची फिर्याद मृताचा भाऊ मंगलदास राजेंद्र जानकर याने दक्षिण पोलिस ठाण्यात दिली असून, संशयित आरोपी असलेल्या वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक काकडे हे करीत आहेत.


0 Comments