Coal Crisis : ... तर वीज थेट परत घेतली जाणार ; कोळसा संकटात महत्त्वाचा निर्णय , आदेश निघाले
कोळसा टंचाईमुळे देशावर मोठं संकट निर्माण झालं आहे. प्रकाशाचा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी यंदा अंधारात बुडून जाईल अशी शक्यता वाटू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्रालयानं केंद्रीय वीज निर्मिती केंद्रांवरून पुरवण्यात येणाऱ्या वीजेच्या वापराबद्दल नियमावली जारी केली आहे. राज्यांना दिली जाणारी वीज त्यांनी ग्राहकांसाठी वापरावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांकडे अतिरिक्त वीज उपलब्ध आहे, त्यांनी याबद्दलची माहिती द्यावी, जेणेकरून त्या विजेचा वापर गरजू राज्यांमध्ये करता येईल, असं आवाहन करण्यात आलं आहे.
एखादं राज्य पॉवर एक्स्चेंजमध्ये विजेची विक्री करताना आढळल्यास, पुरवण्यात येणाऱ्या विजेचं नियोजन न करताना दिसल्यास त्यांना होणारा वीजपुरवठा कमी केला जाऊ शकतो किंवा वीज परत घेतली जाऊ शकते. ही वीज गरजू राज्यांना पुरवली जाईल. विजेचं नुकसान कमी व्हावी वितरक कंपन्यांना (डिस्कॉम) ऊर्जा लेखांकन अत्यावश्यक केलं आहे. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे.
अधिसूचनेत नेमकं काय?
प्रमाणित ऊर्जा व्यवस्थापकाच्या माध्यमातून डिस्कॉमला ६० दिवसांत तिमाही ऊर्जा लेखांकन करावं लागेल. एका स्वतंत्र मान्यता प्राप्त ऊर्जा लेखा परिक्षकाद्वारा वार्षिक ऊर्जा लेखा परीक्षादेखील होईल. हे दोन्ही अहवाल सार्वजनिकरित्या प्रकाशित करावे लागतील. यामुळे विजेचं नुकसान, चोरी रोखण्यास मदत होईल.
१३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट
सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या ७ ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार, देशात १३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट(Coal Shortage) आलं आहे. १६ प्रकल्पात तर एक दिवसाचा कोळसा साठाही शिल्लक नाही. ३० प्रकल्पांकडे १ दिवसाचा कोळसा साठा आहे. तर १८ प्रकल्पात केवळ २ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. म्हणजे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यात हरियाणा आणि महाराष्ट्र येथे ३ प्रकल्प आहेत. ज्यात एक दिवसाचाही कोळसा शिल्लक नाही. याचसह पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार येथे एक एक प्रकल्प आहेत जेथे १ दिवसाचा साठा आहे.
वीज संकटाचा धोका केवळ भारत नव्हे तर चीन, युरोप आणि अमेरिका इथंही निर्माण झालं आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी वाढली आहे. दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे. केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
0 Comments