कोल्लम सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.
सूरजने आपली पत्नी उत्तराची हुंड्यासाठी सर्पदंशाच्या साहाय्याने हत्या घडवून आणली.
पत्नीच्या खोलीत कोब्रा जातीचा नाग सोडून त्याच्याद्वारे सर्पदंश करवून आपल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधला एक व्यक्ती दोषी आढळला आहे. आरोपी सूरजने आपली २५ वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्यासाठी छळ करुन हत्या केल्याचा आरोप आहे. कोल्लम सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.
पत्नी उत्तरा कोल्लमपासून ४० किलोमीटरवर असलेल्या तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना तिला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना ७ मे २०२० रोजी घडली होती. त्यावेळी सूरज-उत्तराच्या लग्नाला २ वर्षे झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूलही आहे. फिर्यादींनी उत्तराचा पती सूरज एस कुमारवर आरोप केला आहे की, त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तपासात असेही समोर आले आहे की, गेल्या वर्षी २ मार्च रोजीही सूरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.
पथानामथिट्टा जिल्ह्यातील अदूरजवळ पारकोडे येथे पतीच्या घरी असताना उत्तराला नाग चावला होता. त्यावेळी तिरवल्ला येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर जवळपास १६ दिवस उपचार करण्यात आले होते. रसेल वायपर साप चावल्यामुळे ती पूर्णपणे आजारी पडली होती. ती ५२ दिवस अंथरुणावर पडून होती. यानंतर तिची प्लास्टिक सर्जरीही करावी लागली होती. उत्तराच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी आणि सूरज जेवणानंतर झोपायला गेले होते. सूरज उशिरा उठायचा. पण दुसऱ्या दिवशी तो लवकर उठून बाहेर गेला होता. तर उत्तराला नेहमीच्या वेळेवर जाग आली नव्हती. तिची आई खोलीत गेली तेव्हा तिला उत्तरा बेशुद्धावस्थेत आढळली होती. नंतर खोलीची झडती घेतली असता तिथे एक नाग सापडला, ज्याला ठार मारण्यात आले.
सूरजला भरघोस हुंडा देण्यात आला. यामध्ये १० लाख रुपये रोख, मालमत्ता, नवीन कार आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. दोन वर्षांच्या अयशस्वी विवाहानंतरही त्याने अधिक हुंडा मागण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उत्तराच्या आईने केला.
उत्तराच्या मृत्यूवरुन तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सूरजला २४ मे रोजी अटक करण्यात आली होती. १२ जुलै रोजी सूरजने जाहीरपणे कबूल केले की त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून १० हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी केले होते. सूरजला विषारी साप विकणारा गारुडी हा या प्रकरणातील आरोपी असला, तरी १ डिसेंबरपासून सुरु झालेल्या खटल्यात तो सरकारी साक्षीदार बनला. सुनावणीदरम्यान, त्याने हेतू जाणून घेतल्याशिवाय सूरजला नाग विकल्याचे न्यायालयाला सांगितले. सूरजवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे, तर त्याचे आई-वडील आणि बहिणीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप आहे. या प्रकरणी बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.
0 Comments