२१ महिलांवर बलात्कार अन् हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा
बेंगळुरु : २१ महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणार्या उमेश रेड्डी या नराधमाला कर्नाटकमधील न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे. उमेश रेड्डी हा मूळचा कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आहे. १९६९ साली त्याचा जन्म झाला. मोठा झाल्यानंतर तो सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला. उमेशची पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती. पुढे १९९६ मध्ये त्याच्यावर बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे त्याच वर्षी त्याने आणखी एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केली.
याच हत्येनंतर उमेश रेड्डी हा खुनी बनला. पुढे त्याने कित्येक महिलांवर बलात्कार केले, तर कित्येक महिलांची हत्या केली.उमेशमधील क्रूरता काळानुसार वाढत गेली होती. २००२ पर्यंत त्याच्यावर देशातील अनेक शहरांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते. बेंगळुरु, म्हैसूर, अहमदाबाद, मुंबई, बडोदा अशा मोठ्या शहरांमध्येदेखील रेड्डीने आपली दहशत माजवली होती. त्याच्यावर २१ महिलांवर बलात्कार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संपूर्ण भारतात त्याला क्रूर खुनी म्हणून ओळखले जाऊ लागले.
हात बांधून बलात्कार, नंतर हत्या
उमेश रेड्डीची दहशत वाढल्यानंतर देशभरातील पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी त्याला यशवंतपूर येथून अटक करण्यात आली. ज्यावेळी त्याला अटक करण्यात आले त्यावेळी त्याच्याजवळ अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या होत्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. आरोपी तरुणी तसेच महिलांना चाकूचा धाक दाखवित असे. त्यानंतर त्यांचे हात बांधून बलात्कार तसेच त्यांची हत्या करीत असे. पोलिसांनी त्याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याजवळ महिलांचे अंतर्वस्त्र सापडले होते. महिलांची हत्या करुन तो त्यांच्या अतर्वस्त्रांची चोरी करत असावा, असादेखील त्याच्यावर आरोप होता. उमेश रेड्डीला उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. हीच शिक्षा पुढे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.


0 Comments