भेसळयुक्त दुधाचा साठा पकडला ; सांगोल्यात कारवाई,पेढी सील,अन्न परवाना रद्द
सोलापूर : दूध भेसळीच्या संदर्भात प्राप्त खात्रीशीर गुप्त माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत दक्षता विभाग मुंबई, अन्न व औषध प्रशासन सोलापूर व इतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत सांगोला तालुक्यातील देवळे येथील रणजित शिवाजी व्हनमाने यांच्या मालकिच्या मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती, या पेढीवर धाड टाकून
तपासणी करण्यात आली.
या तपासणी दरम्यान पेढीमध्ये दुध भेसळीकरीता लिना निळ (अपमिश्रक) या कंपनीच्या 500ml चे 10 सील बंद बॉटल आढळून आल्या. तसेच पेढीच्या बाजूंला असलेल्या युवराज भगवान अलदार (भागीदार) यांच्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर (अपमिश्रक) अमूल ब्रॅण्ड चे 25 kg चे 3 बॅग आढळून आल्या. या ठिकाणी लिना निळ (अपमिश्रक) बाबत रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर निळ ही गाय दूधामध्ये टाकून गायीच्या दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. यावरुन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स या पेढीमार्फत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर या ठिकाणाहून गाय दुध या अन्न पदार्थाचे तसेच व्हे पावडर व लिना निळ या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित 1.गाय दूध 298 ली.- किंमत 8046, व्हे पावडर- (अपमिश्रक) 74 kg किंमत-12074, निळ (अपमिश्रक) (लीना) -6 बॉटल - किंमत 540 असे एकूण - 20,660 चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेले रासायनिक केमिकल्सचा वापर करुन तयार केलेल्या गाय दूधाचा सुमारे 298 लिटरचा साठा नष्ट करण्यात आला. त्यानंतर या पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देऊन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती,मु.पो- देवळे ता- सांगोला जि- सोलापूर या पेढीस मंजुर असलेला अन्न परवाना रद्द करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स या पेढीचे भागीदार रणजित शिवाजी व्हनमाने व इतर 5 भागीदार तसेच सदर पेढीकडून भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी मे. चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर (अपमिश्रक) पुरवठा करणारी पेढी मे. श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर ता - शिरोळ जि- कोल्हापूर यांच्याविरुद्ध भा.दं.वि कलम 34, 272, 273, 420 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत सांगोला पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरुध्द अतिरिक्त भा. दं. वि. कलम 328 व अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे कलम 38(6) व कलम 59 नुसार फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई 23 सप्टेंबर रोजी रात्री झाली.
अन्न प्रशासन आयुक्त परिमल सिंग, पुणे विभाग सह आयुक्त शिवाजी देसाई, सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत, यांच्या मार्गदर्शनखाली अन्न व औषध प्रशासनातील दक्षता विभाग अन्न सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर महाले, अरविंद खडके, राम मुंडे, मिलिंद महागंडे तसेच सातारा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, कोल्हापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे, महेश मासाळ, गणेश कदम व सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, उमेश भुसे यांच्या पथकाने पार पाडली.





0 Comments