आपल्या दमदार कामगिरीने सोलापूर जिल्ह्यात स्वतःची एक वेगळीच छाप निर्माण केलेल्या अतुल झेंडे यांची नुकतीच सोलापूर ग्रामीण येथून रायगड येथे बदली झाली आहे.
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कोरोना महामारीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, त्याचबरोबर पोलिस (Police) कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या खबरदारीसाठी 'कोरोना योद्धा' म्हणून तर, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत 'कायदा व सुव्यवस्था' अबाधित ठेवण्यासाठी 'कडक तेवढेच संवेदनशील', पंढरपूरची वारी अन् त्यानंतर कोरोना काळातील वारीमध्ये वारकरी व प्रशासनामध्ये संघर्ष होत असताना 'खाकी वर्दीतील वारकरी' म्हणून भूमिका बजावलेले अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कमी कालावधीत मिळालेल्या आव्हानात्मक संधीचे सोने केले.आपल्या दमदार कामगिरीने सोलापूर जिल्ह्यात स्वतःची एक वेगळीच छाप निर्माण केलेल्या अतुल झेंडे यांची नुकतीच सोलापूर ग्रामीण येथून रायगड येथे बदली झाली आहे.
त्यांना पोलिस उपअधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर पहिली नियुक्ती सोलापूर जिल्ह्यात झाली, त्यामुळे त्यांच्या कौशल्याचा कस तर लागणार होता. आव्हानात्मक काम करण्याची संधी मिळाली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांची येथे नेमणूक झाली. तसे त्यांचे अन् सोलापूरचे पंढरपूरच्या पांडुरंगामुळे जुने नाते. संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायातील असल्याने जणू त्यांना विठ्ठलाची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली. नेमणूक होते न होते तोपर्यंत सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या माढा व सोलापूर या लोकसभा निवडणुका अन् त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा त्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावत सभेचे योग्य व काटेकोर नियोजन केले होते. तसेच शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान बजावले. निवडणुका पार पडताच पंढरपूरची वारी हे एक आव्हानात्मक काम होते. वारकऱ्यांची योग्य सोय व्हावी यासाठी त्यांनी स्वतः वारकऱ्यांसमवेत मोठ्या दिंड्यांसोबत चालत प्रवास करून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विविध पथके तयार करून आवश्यक त्या ठिकाणी तत्परतेने सेवा दिली. नाशिक येथील महाकुंभ मेळाव्याचा अनुभव पाठीशी असल्याने, या वारीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्यांची तत्परता दिसून आली.
अचानक आलेल्या कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन एकदम ठप्प झाले. या कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या खबरदारीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून असो अथवा प्रतिबंधात्मक क्षेत्रात जाऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी सदैव सक्रिय राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. या काळात प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या खबरदारीसाठी रोगप्रतिकारक शक्तीच्या औषध- गोळ्या वाटप केल्या. पोलिस कर्मचाऱ्यांवर रात्रंदिवस बंदोबस्तासाठी तैनात असल्याने, वाढता ताण लक्षात घेऊन त्यांच्या संकल्पनेतून पोलिसांच्या मदतीसाठी ग्रामीण भागातील गावोगावी युवकांची "कोव्हिड वॉरियर्स' संघटना तयार करून युवकांच्या मदतीने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे युवकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल प्रचंड आकर्षण वाढले. नंतर कोरोना काळातील आषाढी वारीच्या बंदोबस्ताचे नियोजन आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी केलेली उपाययोजना वैशिष्ट्यपूर्ण अशीच होती.
त्याचबरोबर धार्मिक तीर्थक्षेत्रांची ठिकाणे बंद असल्याने, होणाऱ्या आंदोलनप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच लोकांच्या जिवास बाधा होऊ नये यासाठी शासनाने जनतेसाठी घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने ग्रामीण भागात दौरे करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असत. त्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे सद्य:स्थितीला आज ग्रामीण भागातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
पोलिस व होमगार्ड असा भेदभाव न करता त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत दुसऱ्या लाटेत करमाळा तालुक्यातील एका होमगार्ड कर्मचाऱ्याची कोरोनामुळे स्थिती नाजूक असताना उपचारासाठी तातडीने दवाखान्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवर सोय करून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मदतीने वेल्फेअर फंडातून औषधांसाठी पैसे उपलब्ध करून दिले. मानसिक आधार दिल्याने होमगार्ड कर्मचाऱ्याने कोरोनावर मात केली. तसेच 35 वर्षांपासून मोडकळीस आलेल्या इमारतींमधून जिल्हा होमगार्ड कार्यालयाचा कारभार चालायचा, त्या इमारतीची डागडुजी करून रंगरंगोटीसह होमगार्ड कार्यालय डिजिटल व आकर्षक केले. पोलिस मुख्यालयातील अप्पर पोलिस अधीक्षकांचे दालन देखील आकर्षक असे सुशोभित करण्यात आले. कोरोना काळात शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी शासनाची मदत असो अथवा पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असल्याने, त्यांनी अगदी कमी कालावधीत अनेक आव्हानात्मक केलेल्या प्रशासकीय दमदार कामगिरीने पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये विशेषत: युवकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल एक वेगळीच क्रेझ झाल्याने, "रिअल सिंघम' म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली आहे.
0 Comments