सावधान ! आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत सोलापूर शहरात जमावबंदी
गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची खरबदारी घेत पोलिस आयुक्तांनी सोलापूर शहरात आजपासून (गुरुवारी) 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापूर : गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची खरबदारी घेत पोलिस आयुक्तांनी सोलापूर शहरात आजपासून (गुरुवारी) 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाही. आदेश मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल, असेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.
राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सोलापूर हे धार्मिक उत्सव, सण, जयंती, पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरे करणारे शहर आहे. शहरात छोट्या-मोठ्या कारणावरून सभा, संप, आंदोलने, निदर्शने केली जातात. रविवारी (ता. 19) शहरात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा समाजाचे आरक्षण तर ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. दुसरीकडे इंधन दरवाढ व महागाईमुळे केंद्र सरकारविराधोत नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चे, आंदोलने व निदर्शने केली जात आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे शहरात 16 ते 30 सप्टेंबर या काळात जमावबंदी लागू राहील, असेही आयुक्तांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. दुसरीकडे नागरिकांकडील शस्त्रे, दुखापत होणाऱ्या वस्तू वापरांबद्दलही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच असभ्य वर्तन, असभ्य भाषा, निरनिराळ्या जमातींच्या रुढी-परंपराविरुद्ध भावना दुखावतील, भांडण, संघर्ष होईल असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जमावबंदीच्या आदेशानुसार...
लग्न, अंत्ययात्रेसाठी हा आदेश लागू नाही
मिरवणूक, मोर्चा, रॅली, आंदोलन, धरणे, सभांसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
विनापरवाना सभा, मोर्चांवर निर्बंध; पाच तथा त्याहून अधिक व्यक्ती एकत्रित नकोच
परवानगीशिवाय ज्वालागृही, स्फोटक वस्तू, दगड अथवा शस्त्रे जवळ बाळगण्यावरही निर्बंध
गर्दीच्या ठिकाणी वॉच नाहीच
नवे आदेश काढल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी खूप गरजेची आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी आल्यानंतर तिसरी लाट येणार नाही, यादृष्टीने सर्वच प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस नियोजन अपेक्षित आहे. विशेषत: बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण असायला हवे. गर्दीतून कोरोना वाढू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन खूप महत्त्वाचे आहे. बाजार समिती, बाजारपेठा या ठिकाणी पोलिसांचा वॉच असायला हवा. मात्र, तसे काहीच दिसत नसून काहीवेळा पोलिस अंमलदार गर्दीच्या ठिकाणी कारवाई करताना दिसतात. पण, त्यातही सातत्य नसल्याने बेशिस्तपणा वाढू लागल्याचे चित्र आहे.
0 Comments