काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी केलेल्या मदतीची जाणीव राहिली नाही
सांगोला : राज्यातील छोट्या प्रागतिक पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला केलेल्या सहकार्यामुळेच या पक्षांचे ९६ आमदार निवडून येऊ शकले. यामुळेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेची गणिते जुळली, ही वस्तुस्थिती आहे. पण, महाविकास आघाडी सरकार प्रागतिक पक्षांना विचारात न घेता कारभार करीत आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांबाबत या सरकारची भूमिका शेतकरी आंदोलनाचा विश्वासघात करणारी आहे, असा हल्लाबोल शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे यांनी केले. सांगोला येथे 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीसाठी अॅड. राजेंद्र कोरडे हे सांगोलामध्ये आले आहेत. सांगोला येथे सहकारी शेतकरी सूतगिरणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
सन 2019 मधील लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय क्षेत्रात अनेक उलटसुलट घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली. सत्तांध, धर्मांध आणि जात्यांध अशा जनविरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे उद्दिष्टे यशस्वी झाली खरे परंतु राज्यातील छोट्या प्रागतिक पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला केलेल्या सहकार्याची जाणीव राहिली नाही, असा आरोपही कोरडे यांनी केला.केंद्र सरकारची धोरणे ही शेतकरी व कामगार विरोधी आहेत. या सरकारमुळेच महागाई, बेरोजगारी वाढली आहे. अनेक सरकारी उद्योग मोडीत काढून ते खासगी उद्योगसमूहांना कवडीमोल किमतीत विकण्याचा सपाटा केंद्राने लावला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत असून तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तालुक्यातील कार्यकारिणी युती व आघाडीबाबत चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही कोरडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी सांगोला तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या मुद्यांवर होणार बैठकीत चर्चा
राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अनेक स्थानिक समस्या व अडचणी आहेत. या समस्येची सांगड देश व राज्यव्यापी प्रश्नांशी घालून स्वतंत्रपणे तसेच समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन संयुक्तपणे जनआंदोलन उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे, असे कोरडे यांनी या वेळी सांगितले.
दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आघाडी
राज्यात सत्तांध, धर्मांध व जात्यांध अशा जनविरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला शिवसेनेबरोबर आघाडी करावी लागली. राजकारणाचे सिद्धांत कधीकधी बदलत असतात. त्यामुळे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या म्हणीप्रमाणे ही आघाडी झाली आहे, असा दावाही शेकापचे पदाधिकारी कोरडे यांनी केला.
0 Comments