धक्कादायक ! Delta Plus ने मुंबईत घेतला पहिला बळी ; मयत रुग्णाने कोरोना लस घेतली होती तर देखील झाला मृत्यू
कोरोना पाठोपाठ आता राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यातच आता चिंता वाढवणारी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे . मुंबईत डेल्टा प्लसने पहिला बळी घेतला आहे . महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते . मुंबईतील 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे . या महिलेने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते .
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला मधुमेहासह इतर आजारही होते . शहरात नुकत्याच पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी ती एक होती , असं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिलं आहे . राज्यातील डेल्टा प्लस मृतांची संख्या आता दोन झाली आहे . याआधी जूनमध्ये रत्नागिरीत एका महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला होता .
ही महिला संगमेश्वर येथे राहणारी होती . हे डेल्टा प्लस म्हणजे AY.1 हा डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन आहे . जो अधिक संसर्गजन्य आहे.जूनमध्ये हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली होती . महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता . जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते . त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता . दरम्यान जुलैमध्ये डेल्टा व्हेरिएंटची रुग्ण संख्या शून्यावर आली होती .
14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही , अशी दिलासादायक माहिती दिली.पण आता ऑगस्टमध्ये डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे . 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत आणि आता आणखी एक बळीही गेला आहे.त्यामुळे चिंता वाढली आहे . 11 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 65 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे .
नव्याने आढळलेले 20 रुग्ण हे मुंबई , 7 पुणे , 3 नांदेड , गोंदिया , रायगड , पालघर प्रत्येकी 2 , चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत . 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत . सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत . यामध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत .
0 Comments