गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल - पो.नि.जगताप
सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . शहर व ग्रामीण भागातील नागरिक विनाकारण फिरत असून ही रुग्णवाढ ते गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे . परंतु कोरोना रुग्ण वाढीमुळे प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून नियम मोडणाऱ्या विरोधात कडक कारवाईचा बडगा उपसला आहे . आता प्रबोधन बस झाले थेट कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे . राज्यात एकीकडे दुसरी लाट संपत येत असताना सांगोला तालुक्यात मात्र ती कमी होताना दिसत नाही . गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे . नागरिकच याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे . या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनही दक्ष झाले असून शहर व तालुक्यात पोलिसांनी गर वाढवली आहे . विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तसेच वेळेचे बंधन न पाळणारे व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे .यामुळे शहरासह ग्रामीण भागातही बिगर मास्कचे , विनाकारण बाहेर फिरणारे , हॉटेल्स व इतर व्यावसायिकांमध्ये गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले . तहसीलदार अभिजीत सावर्ड पाटील याबाबत म्हणाले की , रुग्ण संख्या वाढत असूनही नागरिक गांभीर्याने घेत नाही.आतापर्यंत नागरिकांचे प्रबोधन फार झाले आता नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूचना न देता थेट कारवाई केली जाईल . ज्यांना कारवाईची भाषा समजते त्यांना त्या भाषेतच उत्तर दिले जाईल असेही त्यांनी सांगितले . गटविकास अधिकारी संतोष राऊत म्हणाले की , सांगोला तालुक्यात जवळ जवळ चार हजार जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहे . गुरुवारी एकाच दिवशी ४ हजार ३०४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या . यामध्ये ५४ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत . यापुढे नियोजननुसार कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार असून नागरिकांनी याबाबत दक्ष राहिले पाहिजेत . शहरात येणाऱ्यांची अगोदर कोरोना चाचण्या केल्या जात होत्या . तशाच प्रकारे चाचण्या सुरु केल्या जातील . व्यावसायिकांनाही नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या असून नागरिकांवर व व्यावसायिकांवर कोरोनाचे नियम मोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असे सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले .
साहेब ... गरजेच्या ठिकाणी कारवाई कराच रस्त्यावर फिरणारे , दुकानदारांवर नियमांवर बोट ठेवत प्रशासन कारवाई करत असले तरी अनेक ठिकाणी वेगवेगळे समारंभ , उदघाटने , लग्न सोहळे मोठ्या थाटामाटात होत आहेत . याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन अशा गर्दीच्या ठिकाणी अगोदर कारवाई करावी , अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत .
0 Comments