जुनी वाहने १५ दिवसांत भंगारमध्ये काढण्यास सुरवात ; नितीन गडकरींची मोठी घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार म्हणून वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले आहे . दरम्यान , अर्थमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल देताच 15 ते 20 वर्षे जुन्या वाहनांना भंगारमध्ये काढण्याची प्रक्रिया पुढील 15 दिवसांतच सुरू करू , अशी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे . सीतारामन यांनी अर्थसंकल्पात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहन स्क्रॅपिंग धोरण आज जाहीर केले आहे . सीतारामन म्हणाल्या की , या धोरणामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट लावता येईल . यामुळे इंधन - कार्यक्षम , पर्यावरणास अनुकूल वाहनांना प्रोत्साहित करण्यास मदत होईल .ज्यायोगे वाहनांचे प्रदूषण आणि तेल आयात कमी होण्यास मदत मिळेल . यावर बोलताना गडकरी म्हणाले की , देशातील 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या 51 लाख गाड्या तसेच जुनी 17 लाख वाहनेही लवकरच भंगारात जाणार आहेत . एकूण 1 कोटींहून अधिक जुन्या गाड्या बंद होतील . त्यातून प्रदूषण कमी होईल आणि रस्ता सुरक्षेलाही मदत होईल . शिवाय यातून 50 हजार रोजगार निर्माण होतील . वाहन निर्मितीच्या क्षेत्रात निर्यात वाढणे , विशेषतः वाहनांचे सुटे भाग भारतातच तयार केले जावेत यासाठी मी प्रयत्न केले . आयात सुट्या भागांवर कर वाढविल्याने ' मेक इन इंडिया'ला आणखी बळ मिळेल . पुढच्या पाच वर्षांत भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होईल . छोट्या आणि मध्यम उद्योगांबरोबर वाहन उद्योग मोठा होत आहे . हा उद्योग 6 लाख कोटींच्या उलाढालीचा होईल . त्यामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट आवश्यकच आहे , जुनी वाहनं प्रदूषण खूप करतात . त्यामुळे ती पर्यावरणाला हानिकारक आहेत . ती रस्त्यावर धावणं बंद करणं हिताचं आहे . म्हणूनच स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्यात येणार आहे . पुढच्या 15 दिवसात वाहनांच्या विल्हेवाटीसंदर्भातले नियम जारी केले जातील , असे गडकरी यांनी म्हटले आहे . काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी ? जुन्या वाहनांची विल्हेवाट लावायची जबाबदारी वाहन मालकांची आहे . 20 वर्षांपूर्वीच्या गाड्या यापुढे वापरता येणार नाहीत . सविस्तर धोरणाची घोषणा पंधरा दिवसात करू , असं गडकरी यांनी सांगितलं आहे . या धोरणानुसार 51 लाख छोटी वाहनं स्क्रॅप होतील . 17 लाख मध्यम वाहनांचंही रिसायकलिंग होईल . यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल . नवी वाहनं रस्त्यावर येतील . जुन्या वाहनांचं स्टील , इतर धातू , रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे . या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल .
0 Comments