प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील कुटुंबांना जुलै ते नोव्हेंबर 2021 साठी मोफत धान्य देण्यात येणार आहे .
सोलापूर , दि .4 : कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील कुटुंबांना जुलै ते नोव्हेंबर 2021 साठी मोफत धान्य देण्यात येणार आहे . प्रती महिना प्रती लाभार्थी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ शासनाने मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली . अंत्योदय अन्न योजनेतील दोन लाख 58 हजार 768 आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील 17 लाख 65 हजार 658 अशा एकूण 20 लाख 24 हजार 426 इतक्या लाभार्थीना रास्त भाव दुकानात मोफत धान्य देण्यात येणार आहे . यासाठी गहू 6073 मेट्रीक टन आणि तांदूळ 4049 मेट्रीक टन नियतन मंजूर झाले आहे . लाभार्थी संख्या आणि रास्त भाव धान्य दुकानदारांकडून शासकीय धान्य गोदामातून होणारी उचल विचारात घेता अंत्योदय अन्न योजनेसाठी दोन लाख 56 हजार 551 लाभार्थ्यांना गहू 770 मेट्रीक टन तर तांदूळ 513 मेट्रीक टन धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे . प्राधान्य कुटुंबातील पात्र 16 लाख 98 हजार 586 लाभार्थ्यांसाठी गहू 5096 मेट्रीक टन आणि 3397 मेट्रीक टन तांदूळ शासकीय धान्य गोदामनिहाय उपलब्ध करून देण्यात येत आहे . मागील शिल्लक वजा करून रास्त भाव धान्य दुकानांना नियतन उपलब्ध करून देण्यात येत आहे . संबंधितांनी धान्याचे वितरण विहित कालावधीत होईल , याची खबरदारी घ्यावी , असे आवाहन श्री . कारंडे यांनी केले आहे .
0 Comments