मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अपघात ! दोघे जागीच ठार
आजीच्या अस्थि विसर्जनापूर्वीच अविवाहित तरुण नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने या मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.मंगळवेढा (सोलापूर) : मयत आजीच्या तिसऱ्या दिवशी अस्थि विसर्जनासाठी बेगमपूर येथे जात असताना मंगळवेढा - सोलापूर रोडवर टेम्पोशी झालेल्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. आजीच्या अस्थि विसर्जनापूर्वीच अविवाहित तरुण नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, की अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21) याच्या आजी भामाबाई दाजी मेटकरी (वय 66) हिचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. आज (शनिवारी) आजीच्या तिसऱ्या दिवसाचा विधी पूर्ण झाल्यानंतर बेगमपूर येथील भीमा नदी पात्रात अस्थि विसर्जनासाठी बंडू पांडुरंग गोरे (वय 42) व अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21) हे दोघे दुचाकी (एमएच 13 डीएल 1178) वरून जात होते. मात्र सकाळी 9.45 च्या दरम्यान सोलापूरहून कोल्हापूरकडे जाणारा टेम्पो (एमएच 10 सीआर 6681) चा चालक मोहसीन गौस शेख (रा. निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हा भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामध्ये अरविंद ज्ञानेश्वर मेटकरीचा जागेवरच मृत्यू झाला तर बंडू गोरे हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. हा अपघात मुख्य रस्त्यावर झाल्याने वाहनांची कोंडी झाली. वाहनधारक व बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तत्काळ वाहनाची कोंडी सोडवण्याच्या सूचना केल्या. या अपघाताची फिर्याद सोपान मेटकरी यांनी दिली असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निंबाळे हे करीत आहेत.मृत अरविंद मेटकरी हा अविवाहित असून संगणक क्षेत्रात तज्ज्ञ होता. तर बंडू गोरे हा शेती करत होता. आजीच्या मृत्यूने दु:खात असणाऱ्या मेटकरी कुटुंबीयांना तरुण नातूचाही अपघाती मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments