महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा
कोरोना संसर्ग कमी असणार्या राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली असून यात जळगावचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध उठणार असून स्थानिक पातळीवर याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आज टास्क फोर्सची बैठक पार पडल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याबाबतची माहिती दिली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध उठविण्याबाबत घोषणा केली असली तरी स्थानिक प्रशासन स्वतंत्र नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची स्थानिक पातळीवर घोषणा करणार आहे. यामुळे जिल्हाधिकार्यांच्या घोषणेपर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू राहतील हे स्पष्ट आहे.
0 Comments