सातारा , ता . २ ९ : सव्हें नंबरमधील क्षेत्रात एक , दोन , तीन गुंठे खरेदीस आता शासनाने बंदी घातली आहे .
त्यामुळे एकत्रित जमिनीचे तुकडे पाडून खरेदी - विक्रीचे व्यवहार करताना दस्तनोंदणी होणार नाही . त्यासाठी संबंधित जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन लेआउट केल्यासच गुंठानिहाय खरेदी होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागात काही एकरांत जमीन खरेदी करून तिची गुंठ्यात विक्री करण्याच्या प्रकाराला शासनाने चाफ लावल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे जमिनी खरेदी - विक्री करणाऱ्यांची अडचण झाली आहे . जमीन खरेदी - विक्रीचे व्यवहार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहेत . यामध्ये एकरात जमिनीची खरेदी करून तिची गुंठ्यात विक्री करण्याचे प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहेत . यातून रिअल इस्टेट एजंटाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहे . पण , राज्य शासनाने १२ जुलै रोजी एक शासन निर्णय काढून त्याव्दारे गुंठ्याच्या खरेदीला बंदी घातली आहे . अशा एक , दोन , तीन गुंठ्यांच्या जमिनीची खरेदी करताना दस्त नोंदणी होणार नाही . गेल्या वर्षभरात जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत . त्यामुळे जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत . महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू केलेली आहे . तरी देखील असे व्यवहार होत असून ,त्याची दस्तनोंदणीही होत आहे . याबाबतच्या चौकशीचे आदेश मुद्रांक शुल्क विभागाला दिले होते . यामध्ये अनेक प्रकार झाल्याचे निदर्शनास आले होते . त्यानुसार शासनाने दस्त नोंदणी करताना तुकडेबंदी करून जमिनीचे एकत्रिकरण करण्यास परवानगी दिली आहे . आता एक , दोन व तीन गुंठ्यांच्या खरेदीचे दस्त नोंदणी होणार नाही . पण , सर्व्हे नंबरचा लेआउट करून त्यामध्ये गुंठे तयार करून त्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी व मंजुरी घेतली असेल तरच दस्त नोंदणी होणार आहे . यापूर्वी ज्यांनी अशी तुकड्यात खरेदी केलेली आहे , त्यांनाही आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे . तसेच ज्यांच्या जमिनीची तुकड्याची शासन भूमीअभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन मोजणी केलेली आहे , त्यांच्या हद्दी निश्चितीचा नकाशा देण्यात आलेला आहे , अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या विभाजनास या अटी - शर्ती लागू राहणार आहेत .
0 Comments