पती पत्नीच्या वादाची शमतच नव्हती धग!—-पूजाची हत्या करुन सुनिलने दाखवली रग!!
जळगाव : सुनिल बळीराम पवार हा अल्पशिक्षीत तरुण होता. जेवढे त्याचे शिक्षण तेवढी त्याची बुद्धी होती. जळगावच्या शिवाजी नगर गेंदालाल मिल भागात तो रहात होता. त्याचा स्वभाव मुळातच रागीट आणि खुनशी प्रकारातील होता. लग्नापुर्वी तो एका होलसेल वस्तूंच्या दुकानावर डिलेव्हरी बॉय म्हणून कामाला होता. कामाला असलेल्या दुकानावर त्याचे मन काही रमले नाही. काही दिवसातच त्याने दुकानावरील डिलेव्हरी बॉयची नोकरी सोडून दिली. काही दिवस भटकंती केल्यानंतर त्याला जळगाव महानगरपालिकेत रोजंदारी स्वरुपात कंत्राटी कामगार म्हणून काम मिळाले. दरम्यान त्याचे लग्नाचे वय देखील झाले होते.जळगाव पासून जवळच असलेल्या पाळधी येथील पुजा नावाच्या तरुणीसोबत त्याचा विवाह ठरला व पार पडला. लग्नानंतर देखील सुनिलचा रागीट स्वभाव तसाच राहिला होता. चार बहिणी व एक भाऊ असलेली पुजा आता सुनीलची पत्नी म्हणून पाळधी सोडून जळगावला सासरी आली होती. नव्याने लग्न झाले असल्यामुळे तिने सुनिलचा स्वभाव सुरुवातीच्या काळात बराच सहन केला. या कालावधीत सुनिल व पुजा यांच्या संसारवेलीवर देवाघरची दोन फुले उमलली. एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये दोघांच्या संसारात आली होती. ओम आणि भाग्यश्री अशी त्यांनी दोघा मुलांची नावे ठेवली. बघता बघता दोन्ही मुले मोठी होत गेली. ओम हा दहा वर्षाचा तर भाग्यश्री ही सात वर्षाची झाली होती. दोन मुले झाल्यामुळे सुनिलच्या तापट स्वभावात काहीतरी बदल होईल असे पुजाला वाटत होते. मात्र त्यात काहीच परिवर्तन झाल्याचे तिला दिसून येत नव्हते. उलट तो तिच्या चारीत्र्यावर संशय घेऊ लागला. सुनिल आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे बघून पुजाला साहजिकच त्याचा राग आला होता. मात्र तरी देखील तिने त्याला सुरुवातीला चांगल्या शब्दात समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तिच्या चारित्र्यावर जास्तच संशय घेऊ लागला. त्यामुळे पती पत्नीच्या शब्दामागे शब्द वाढतच होता. पती पत्नीच्या या वादाचा थेट परिणाम त्यांच्या दोघा मुलांच्या मनावर होत होता. मात्र सुनिलला त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते. तो मुलांसमोरच पुजाला अश्लिल शब्दात बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे काम करत होता. संशयाने पछाडलेला सुनिल तिला माहेरी पाळधी येथे देखील जाऊ देत नव्हता. त्यामुळे पुजाच्या मनाची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असे. 18 फेब्रुवारी रोजी पुजाचा चुलतभाऊ मंगेश चव्हाण याचे पाळधी येथे लग्न ठरले. या लग्नानिमीत्त सासरकडील लोकांनी जावयाचे नाते असलेल्या सुनिल यास घरी येऊन चुलत शालकाच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले. मात्र पुजाचा राग मनात असल्यामुळे सासरी जायचे नाही असे त्याने मनाशी ठरवले होते. तो चुलत शालक मंगेशच्या लग्नाला गेलाच नाही. मात्र लग्नाच्या निमीत्ताने माहेरी जाण्याची संधी पुजाला मिळाली होती. ती मुलांना सोबत घेऊन माहेरी पाळधी येथे निघून आली. सुनिल मात्र घरीच होता. लग्नाच्या निमीत्ताने पाळधी येथे गेलेली पूजा पुन्हा सासरी येण्याचे काही केल्या नावच घेत नव्हती. त्यामुळे त्याच्या संतापात मोठी भर पडली होती. तिच्या चारित्र्यावर सुरुवातीपासून तो संशय घेत होता. दरम्यानच्या कालावधीत पती पत्नीत वादाच्या कुरबुरी सुरुच होत्या.पूजा जळगावला येण्याचे नाव घेत नसल्यामुळे त्याने पत्नी हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशनला मुद्दाम दाखल केली. आपला पती आपल्याला मानसिक त्रास देत असल्याबाबत पुजाने पाळधी येथील दुरक्षेत्रात तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्याला समज देण्यासाठी बोलावणे पाठवले. पुजाने आपली पोलिसात तक्रार दाखल केल्याचे समजताच त्याचा तिच्यावरील राग अजूनच वाढला. तो पाळधी येथे आला मात्र पोलिसांकडे गेला नाही. तो तिच्या पाळतीवर होता. त्याने एक चाकू देखील विकत घेतला.अखेर पुजाच्या जिवनातील तो अखेरचा दिवस जवळ आला. 23 जून रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास पुजा, तिची नाशिक येथील चुलत बहिण उर्मिला व दहा वर्षाचा मुलगा ओम यांच्यासोबत मारवाडी गल्लीतील खुशी श्रृंगार शॉपी येथे वस्तू खरेदीसाठी गेले होते. दुकानातून तिघे जण घराच्या दिशेने जाण्याच्या बेतात होते. तेवढ्यात पूजाच्या मागावर टपून बसलेला सुनिल तेथे दाखल झाला. आल्या आल्या त्याने पूजाला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या चुलत बहिणीला भर रस्त्यात चारचौघात होत असलेली मारहाण उर्मिलास बघवली गेली नाही. तिने या निंदनीय प्रकारापासून सुनिल यास परावृत्त करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र तिला त्यात अपयश आले. संतप्त झालेल्या सुनिलने पुजाचा गळा आवळण्यास सुरुवात केली. गळा आवळला जात असल्यामुळे ती जवळच असलेल्या ओट्यावर पडली. गळा दाबून देखील पुजा जिवंत असल्याचे बघून सुनिलचा संताप अजूनच वाढला. त्याने खिशातील चाकू बाहेर काढला. आपण संतापाच्या भरात काय करत आहोत याचे त्याला भान राहिले नव्हते. भान विसरुन त्याने पुजाच्या पोटावर, मानेवर, छातीवर आणि गळ्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.हा प्रसंग अतिशय थरारक होता. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. रस्ता काही क्षणातच जवळपास निर्मनुष्य झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पुजा जिवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत होती. तिच्या वेदना तिला असह्य झाल्या होत्या. ती आपला जिव वाचवण्यासाठी लोकांच्या धावा करत होती. काही वेळापुर्वी आपल्यासोबत चांगली बोलणारी पुजा आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून तिची चुलत बहिण उर्मिला प्रचंड भेदरली होती. तिच्याहून तिचा दहा वर्षाचा मुलगा तर प्रचंड भेदरला होता. आपल्या आईचा रक्ताच्या थारोळ्यातील पडलेला प्रसंग त्या लहान बालकाच्या मनावर कायमचा कोरला गेला. सुनिल हातातील चाकूसह पळून जात असल्याचे बघून उर्मिलाने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. मात्र तो चपळाईने संतापाच्या भरात पुजाच्या माहेरी गेला. त्याने पुजाचा भाऊ अर्थात त्याचा शालक शंकर भिका चव्हाण याच्यावर देखील चाकूचे वार केले. चाकूच्या वारात शंकर देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाला. जमलेल्या लोकांनी पूजासह तिचा भाऊ शंकर या दोघांना जळगाव येथे वैद्यकीय उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पुजाचा जिव वाचू शकला नाही. तिच्या अंगावर चाकूचे जागोजागी घाव बसले होते. त्यामुळे ती मरण पावली होती. तिचा गंभीर जखमी भाऊ शंकर मात्र सुदैवाने बचावला होता. दरम्यानच्या कालावधीत जमलेल्या काही लोकांनी सुनिल यास पकडून बेदम चोप देत पाळधी दुरक्षेत्र येथे आणून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.


0 Comments