बापाकडून मुलाचा खुन
अकलूज : घरजागेच्या कारणावरून झालेल्या बाप- लेकाच्या मारहाणीत मुलगा मिरावली लालासो शेख (वय 32, रा. प्रतापसिंह चौक) याचा खून झाला. याप्रकरणी दुसरा मुलगा हुसेन लालसो शेख याने पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार वडील लालासो मकबूल शेख (वय 60, रा. शिवतेजनगर, यशवंतनगर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहेे. ही घटना सोमवारी सायंकाळी (दि. 24) यशवंतनगर, अकलूज येथे घडली.
लालसो यांना मिरावली व हुसेन अशी दोन मुले आहेत. लालसो हे शिवतेजनगर येथे कुटुंबासह राहायला आहेत. तर मकबूल हा प्रतापसिंह चौक येथे राहायला होता. त्यांच्यात घरजागेच्या कारणावरून वाद सुरू होता. याच कारणातून सोमवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास मिरावली शेख हा शिवतेजनगर, यशवंतनगर येथे आला. त्याने वडील लालासो, आई रुबाबी व लहान भाऊ हुसेन शेख यांना शिवीगाळ, दमदाटी सुरू केली. ऐवढ्यावरच न थांबता त्याने हातात लोखंडी गज घेऊन आई-वडील व भाऊ यांना मारहाण करायला सुरुवात केली. लालसो यांनी मीरावलीचा हल्ला चुकविला. त्यानंतर त्यांनी त्याच्या हातातील लोखंडी गज हिसकावून घेतला. तोच जोरात मुलगा मिरावली शेख याच्या डोक्यात व कपाळावर मारला. यावेळी गजाचा मार वर्मी लागल्याने तो गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत हुसेन शेख याने अकलूज पोलिसांत खुनाची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट दिली.


0 Comments