google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात कोरोना नियमांची ऐशीतैशी ! 18.80 लाखांचा दंड वसूल सांगोल्यात कोरोना नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

Breaking News

सांगोल्यात कोरोना नियमांची ऐशीतैशी ! 18.80 लाखांचा दंड वसूल सांगोल्यात कोरोना नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

सांगोला (सोलापूर) : कोरोना  निर्बंध काळात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर सांगोला पोलिसांनी  1 जानेवारीपासून 24 मे 2021 अखेर 4 हजार 588 जणांवर कारवाई केली असून, तब्बल 18 लाख 80 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली


कोरोनाचा प्रादुर्भाव सांगोला शहरासह तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसह लपून- छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर देखील कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. निर्बंध काळात मास्क न लावणाऱ्यांवर देखील प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनामास्क फिरणे, नियमापेक्षा जास्त प्रवासी, दिलेल्या वेळेत दुकाने बंद न करणे, दुकानात पाच पेक्षा जास्त लोक, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, विनाकारण बाहेर फिरणे, विनामास्क फळे व भाजी विक्री करणाऱ्या 4 हजार 588 जणांवर कारवाई केली असून यांच्याकडून 18 लाख 80 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना काळात प्रशासनाने शहरात केवळ अत्यावश्‍यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. या काळात देखील अनेक विक्रेत्यांनी लपून- छपून व्यवसाय केल्याचे आढळून आले. त्यामुळे सहा आस्थापनांवर कारवाई करून ती सील करण्यात आली आहेत. दोन हजार 822 विनामास्क फिरणाऱ्यांकडून 14 लाख 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मोटारसायकलवर डबलसीट प्रवास करणाऱ्या 59 जणांकडून 29 हजार 500 रुपये तर तिघांनी प्रवास करणाऱ्या 8 जणांकडून 6 हजार रुपये, चार चाकीत तीनपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 21 जणांकडून 10 हजार 500 रुपये, निर्धारित वेळेत आस्थापना बंद न करणाऱ्या 35 जणांकडून 35 हजार रुपये, पाचपेक्षा जास्त लोक असणाऱ्या चार दुकानदारांकडून 2 हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 580 जणांकडून 1 लाख 16 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या 884 जणांकडून 88 हजार 400 रुपये, दुकानामध्ये विनामास्क असणाऱ्या 35 दुकान मालकांकडून 35 हजार रुपये, शॉपिंग सेंटरमध्ये विनामास्क / सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या 3 जणांकडून 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या एका देशी दारू दुकानदाराकडून 4 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 129 जणांकडून 1 लाख 14 हजार 500 रुपये, विनामास्क फळे, भाजी विक्री करणाऱ्या 5 जणांकडून 2 हजार 500 रुपये, शासकीय नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल एका परमीट रूम मालकाकडून 10 हजार तर खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून 10 हजार रुपये दंड अशा एकूण 4 हजार 588 केसेस मधून 18 लाख 80 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments