google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विश्वासघातकी महाविकास आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली- चेतनसिंह केदार-सावंत

Breaking News

विश्वासघातकी महाविकास आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली- चेतनसिंह केदार-सावंत

 विश्वासघातकी महाविकास आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली- चेतनसिंह केदार-सावंत 


सांगोला (तालुका प्रतिनिधी): लॉकडाऊन काळातील वीज ग्राहकांचे बिल माफ करावे, थकीत ग्राहकांची वीज तोडणी करू नये यासाठी भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. 2 मार्च रोजी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वीज तोडणीला स्थगिती दिली. मात्र अवघ्या आठवड्यात महाविकास आघाडी सरकारने घुमजाव करत वीज बिल थकीत ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेले महाविकास आघाडी हे विश्वासघातकी सरकार असल्याची जळजळीत टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे. लॉकडाऊन काळातील घरगुती, शेती पंप, व्यापारी, लघु उद्योजकांची विज बिले माफ करावीत, मीटर रिडिंग ऐवजी सरासरी बिले देण्यात आली तसेच 1 एप्रिल 2020 पासून वाढ करण्यात आलेली बिले रद्द करावीत, राज्य सरकारचा 16 टक्के आधीभाग व वहन कर रद्द करावा, वीज उत्पादन कंपनीचे अॉडिट करण्यात यावे, या मागण्यांसाठी भाजपने राज्यभर बोंबाबोंब आंदोलन, होळी आंदोलन, घंटानाद आंदोलन केले. भाजपच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या अधिवेशन काळात थकीत वीज ग्राहकांच्या कनेक्शन तोडणीला स्थगिती दिली. मात्र अवघ्या आठवड्यातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी घुमजाव करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय न देता वीज बिले न भरल्यास वीज तोडणी मोहिमेचा घाट घातला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारने राज्यातील करोडो जनतेचा विश्वासघात केला असून जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेले आघाडी सरकार विश्वासघातकी सरकार असून गोरगरीब कुटुंबांना आर्थिक संकटात टाकले असल्याची जळजळीत टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी आघाडी सरकारवर केली आहे. अधिवेशन काळात वीज बिल माफीसाठी जनता आंदोलन करेल यासाठी अधिवेशनाला विरोध होऊ नये यासाठी खोटे आश्वासन दिले. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आघाडी सरकारने राज्यातील जनतेला खोट्या आश्वासनाची भुरळ घातली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी वीज तोडणीला स्थगिती दिली तर दुसरीकडे काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून सर्वकाही आलबेल नसून आघाडीत बिघाडीची नांदी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तडजोड करून सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे. आघाडी सरकारने थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय मागे घेऊन लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments