महूद ( सोलापूर ) : अकरावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ह्याची चौकशी करताना पोलिस तपास अधिकाऱ्याने तरुणास बेदम मारहाण करून घरी सोडून दिले . मारहाणीमुळे दबावाखाली आलेल्या या तरुणाने चिकमहूद ( ता . सांगोला ) येथे आपल्या घरासमोरील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली . संबंधित तपास अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा , अशी मागणी युवकाच्या कुटुंबीयांनी केली आहे .
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे राहणाऱ्या दादासाहेब शंकर देठे या तरुणाने काल ( सोमवारी ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . चिकमहूद येथे राहणाऱ्या एका मुलीच्या भावाने दादासाहेब देठे याच्या विरोधात रविवारी ( ता . 7 ) अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याची तक्रार नोंदवली होती . या तक्रारीची चौकशी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने रात्री उशिरा दादासाहेब देठे यास महूद येथील पोलिस कार्यालयात बोलावून चौकशी केली . या वेळी या तरुणाची आई व बहीणही त्याच्यासमवेत होती . चौकशी दरम्यान तपास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने दादासाहेब देठे यास प्रचंड दबावाखाली घेतले आणि बेदम मारहाण केली . शिवाय हे प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक व्यवहाराची मागणी करून घरी सोडून दिले . या सर्व प्रकारामुळे या तरुणाचे मानसिक स्वास्थ्य बिघडून त्याने आत्महत्या केली , असा आरोप या तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे . संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय या तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाऊ नये , अशी मागणी करत संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना मज्जाव केला होता . सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी याबाबत कुटुंबीयांची समजूत काढून योग्य तो तपास केला जाईल , असे सांगितल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगोल्याला पाठवण्यात आला .पोलिस कर्मचाऱ्यांच्या जाचामुळे युवकास आत्महत्या करावी लागली आहे . त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना न्याय देण्याकरिता संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत , अशी भूमिका आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सांगितले . रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता . अल्पवयीन मुलीस पळविल्याची तक्रार सांगोला पोलिसात दाखल आहे . त्याची चौकशी केली असता मुलगी सापडली आहे . मुलीने मैत्रिणीकडे गेली असल्याचे सांगितल्याने मुलीला व दादा देठे यास नातेवाइकांच्या ताब्यात दिले होते . सोमवारी पोलिस सटेशनमध्ये फिडबॅक देण्यासाठी बोलावले होते . तिथे मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा विषय निघाल्यानंतर मुलगा बाहेर पडला . त्यानंतर आत्महत्येची खबर मिळाली . कर्मचारी तपास करत असल्याने त्यावर आरोप होत आहेत . पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर


0 Comments