धक्कादायक ! तुमच्या पत्नीला आमच्या पार्टीत घेऊन ये, म्हणत नेले महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला पळवून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या तुमच्या पत्नीला आमच्या पार्टीमध्ये घेऊन ये, असे नूतन महिला सदस्याच्या पतीला म्हटले असता, त्याने नकार देताच महिला सदस्याच्या पतीलाच शिवीगाळ व दमदाटी करत कारमध्ये घालून पळवून नेल्याची घटना डोंगर पाचेगाव (ता. सांगोला) येथे घडली.
सांगोला (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या तुमच्या पत्नीला आमच्या पार्टीमध्ये घेऊन ये, असे नूतन महिला सदस्याच्या पतीला म्हटले असता, त्याने नकार देताच महिला सदस्याच्या पतीलाच शिवीगाळ व दमदाटी करत कारमध्ये घालून पळवून नेल्याची फिर्याद त्याच्या भावाने सांगोला पोलिसात दिली आहे. ही घटना 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास डोंगर पाचेगाव (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी धोंडीराम हरिभाऊ खरात (रा. डोंगर पाचेगाव, ता. सांगोला) यांची भावजय वैशाली महादेव खरात या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. 26 फेब्रुवारी रोजी त्यांच्या गावातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 फेब्रुवारी रोजी फिर्यादी, त्याचा भाऊ देवाप्पा हरिबा खरात व इतर काहीजण गावात कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी सात वाजता आले होते. कार्यक्रमानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ते सर्व घरी जात असताना फिर्यादीचा भाऊ देवाप्पा हरिबा खरात व त्याच्यासोबत दगडू काबुगडे हे मोटारसायकलवरून जात होते. त्याच्या पाठीमागून फिर्यादी व इतरजण निघाले होते. पिंटू भिले यांच्या शेताजवळ एक पांढऱ्या रंगाची कार (नंबर 9999) व पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (एमएच 16 - एबी 3559) रस्त्यावर थांबली होती. या गाडीजवळ समाधान ऊर्फ पप्पू शिवाजी कर्चे, मुरारजी शिवाजी कर्चे, सचिन बयाजी बोरकर, समाधान गजेंद्र मंडले, अमोल राजाराम मंडले, किरण मलमे, नवनाथ चव्हाण थांबले होते. या ठिकाणी फिर्यादीचा भाऊ देवाप्पा हरिबा खरात जात असताना त्याची गाडी अडवून फिर्यादीच्या भावास, निवडून आलेल्या वैशाली खरात यांना आमच्या पार्टीमध्ये घेऊन ये, असे म्हणत होते. त्या वेळी फिर्यादीच्या भावाने (महिला सदस्याच्या पतीने) तुमच्या पार्टीत येणार नाही, असे म्हटले असता फिर्यादीच्या भावास शिवीगाळ व दमदाटी करून काहीजणांनी गाडीमध्ये ढकलून पळवून नेले. त्यामुळे फिर्यादी धोंडीबा हरिबा खरात यांनी समाधान ऊर्फ पप्पू शिवाजी कर्चे, मुरारजी शिवाजी कर्चे, नवनाथ आदीक चव्हाण, समाधान गजेंद्र मंडले, अमोल राजाराम मंडले (सर्व रा. डोंगर पाचेगाव), किरण मलमे, सचिन बयाजी बोरकर (दोघे रा. किडबिसरी, ता. सांगोला) या सात जणांनी त्यांच्या पार्टीत येण्यास नकार दिल्याने भावास पळवून नेले, अशी तक्रार पोलिसांत केली आहे.


0 Comments