सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : अंगावर सोन्याचे दागिने असलेले सावज हेरून त्यांना लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडून सांगोला पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे .
उमदी येथे महिलेस लुटून पळून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पोलिसांनी सुमारे दोन तास फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ग्रामस्थांच्या मदतीने तिघांपैकी महिलेसह एकास पकडले तर एकजण पळून गेला . यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार , फायबरचे दांडके , कपडे व उमदी येथील महिलेचे लुटलेले सुमारे १ लाख ४६ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले . या गुन्हात ज्ञानेश्वर विठ्ठल घोरपडे रा.उपळवटे ता.माढा व मिना दिलीप पाटील रा.शिराळा ता.परांडा या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या . देशमुख यांनी बुधवार १३ जानेवारी पर्यत पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे पकडलेले सराईत गुन्हेगार रेकॉडवरील असून त्यांनी सोलापूर , उस्मानाबाद , सांगली हद्दीत केलेले गुन्हे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.याबाबत सविस्तर माहिती अशी , तरंगेवाडी ता.सांगोला येथील वृद्ध महिलेस कडलास येथे सोडतो असे सांगून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून चार अज्ञात चोरट्यांनी तिला मारहाण करून १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून लूट केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी घडली असून सांगोला पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत . याच पद्धतीने जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन व मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक असे सलगपणे घडत असल्याने गुन्ह्यातील आरोपी व पांढऱ्या रंगाच्या गाडीचा पोलिस शोध घेत होते .दरम्यान ८ जानेवारी रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेस लूटमार करून स्विफ्ट कार सांगोलाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ पोलिसांची पथके जत रोड व मिरज रोडवर रवाना केली . मात्र , सदरची कार नाकेबंदी चुकवून कडलास कडून सांगोलाच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली . मात्र चालकाने कार न थांबविताच भरधाव वेगाने सांगोल्याच्या दिशेने गेल्याने पोलिसांनी त्या कारचा वाढेगाव , सावे , देवळे , बामणी , मांजरी , पवारवाडीपर्यत फिल्मी स्टाईलने पाठलाग केला . पोलिस अधिकारी , कर्मचारी कारचा पाठलाग करीत असताना सदर कार मांजरी ता . सांगोला गावातील अशोक शिनगारे व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पवारवाडीपर्यंत पाठलाग करून पकडली . मात्र कारमधील एक महिला व पुरुष मक्याच्या पिकात पळून गेल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुमारे २५ एकर शेताच्या परिसरात ज्वारी , मका , डाळिंब अशा पिकातून या दोघांचा सुमारे अडीच तास शोध घेऊन ताब्यात घेतले .


0 Comments