केसांच्या मशरूम कट वरून सापडला चोरटा, ३५ लाखांचा मारला होता डल्ला
पालखी व सत्यनारायणाचे दर्शन घेऊन लंपास केले ३५ लाख
केसांच्या मशरूम कटवरून सापडला चोरटा, पोलिसांची मोठी कामगिरी
चोर ,दरोडेखोर रात्री व शक्यतो मध्यरात्री च्या वेळेस चोरी करून घरातील सर्व पैसे व इतर माल चोरून नेत असतात या वेळी त्यांना आडकाठी आणल्यास जबर मारहाण ही करीत असतात परंतु मंगळवेढा येथे मंगळवार दि.१२ जानेवारी रोजी दिवसा भरदुपारी वास्तूशांतीच्या दिवशी घरी जावून पालखी व सत्यनारायणाचे दर्शन घेऊन चोरट्याने तब्बल ३५ लाखांचा डल्ला मारला आहे.भर दुपारी झालेल्या या चोरी मुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी मोठया कौशल्याने आरोपीची शरीरयष्टी व केसांच्या मशरूम कट वरून त्यास ताब्यात घेऊन चोरीचा तपास उघडकीस आणला आहे.
या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली असून आरोपी सर्वेश्वर दामू शेजाळ, वय 35 वर्षे रा. गोणेवाडी ता. मंगळवेढा हल्ली रा.दुर्गा माता नगर मंगळवेढा याला पस्तीस लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या बाबत ची अधिक माहिती अशी की,रविवार दि.१० जानेवारी २०२१ रोजी संजय महादेव आवताडे रा.खंडोबा गल्ली मंगळवेढा यांच्या नविन घराची वास्तूशांतीचे कार्यक्रम असल्याने विनायक माधवराव यादव रा.मारापूर ता.मंगळवेढा हे सहकुटुंब आले होते.त्याच दिवशी आवताडे यांचे घरी , तामदर्डी ता. मंगळवेढा येथील रंगसिध्द देवाची पालखी आली होती.विनायक यादव व त्यांचे नातेवाईक हे कार्यक्रमाकरीता आल्यानंतर नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर थांबले होते. सदर वास्तूशांतीच्या कार्यक्रमाकरीता आलेले नातेवाईक व घरातील लोक हॉलमध्ये जमले होते.दुपारी १२ वा. च्या दरम्यान रंगसिध्द देवाची आरती चालु झाल्याने, आरतीसाठी फिर्यादी व इतर नातेवाईक घाईगडबडीने सोबत आणलेली बॅग व इतर साहित्य आहे त्या परिस्थितीत सोडून खालच्या हाॅलमध्ये आरतीसाठी गेले.
आरती झाल्यानंतर फिर्यादी हे त्यांचे पाहुण्या रावळयांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर, जेवण करून पहिल्यामजल्यावर आले असता, त्यावेळी त्यांनी आणलेल्या बॅगेची चैन उघडी दिसली, बॅग चेक केली असता, बॅगेतील सोन्याचे दागिने असलेले पाउच दिसून आले नाही. त्यांनी सदर पाउच हे संपूर्ण बॅगेत व रूममध्ये शोधले ते सापडले नाहीे.सदरचे पाउच हे चोरीस गेले असल्याची त्यांची खात्री झाली, तसेच त्यांचे नातेवाईक संजय महादेव आवताडे यांनी त्यांचेही काही सोने चोरीस गेले असल्याचे समजले म्हणून यातील फिर्यादी विनायक यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली व स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि रवींद्र मांजरे व त्यांचे पथक आरोपीच्या मागावर होते.सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याच्या घटनास्थळी एल.सी.बी.च्या पथकाने भेट देवून सदर ठिकाणचे व्हिडिओ शुटिंग व सी.सी.टी.व्ही. कॅमेरा याची तपासणी केली. त्यावरून एक अनोळखी संशयित इसम हा त्यादिवशी घरामध्ये वावरत असल्याचे दिसले,
सदर इसमाने घातलेले कपडे, उजव्याहाताती दो-याचा गोफ, डाव्या हातातील घडयाळ, केसाचा मश्रूम कट, शरिरयष्टी इ. माहिती घेतली असता, सदरचा इसम हा मंगळवेढा येथीलच राहणारा असून तो सध्या दुर्गामाता नगर मंगळवेढा येथील पवार यांचे घरात भाड्याने राहवयास असल्याचे समजले.
सदरचा इसम हा मंगळवेढा येथील दामाजी चैकात थांबला असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली. दामाजी चौकात जावून त्यास ताब्यात घेतले. त्यास प्राप्त सी.सी.टी.व्ही. फूटेज व व्हिडिओ रेकाॅडिंग दाखविले असता त्यातील इसम मीच असल्याचे त्याने सांगितले. त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, त्यावरून त्याचा संशय आल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्याने सांगितले की, वास्तूशांतीच्या दिवशी त्यांचे घरी जावून पालखीचे व सत्यनारायणाचे दर्षन घेवून, पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेलो होतो,तेथे असलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने असलेले पाउच व पैशाची पर्स चोरी केल्याचे सांगितले.
चोरलेले सोन्याचे दागिने व पैसे गोणेवाडी ता. मंगळवेढा येथे जावून शेतातील बांधावर खड्डे करून पुरून ठेवल्याचे सांगितले. त्याने गोणेवाडी ता. मंगळवेढा येथील शेतातील बांधावर पुरून ठेवलेले दागिने व पैसे काढून दिले.
त्याचेकडून सोन्याचे नेकलेस, पोहे हार, गंठन, बाजूबंद, पाटल्या, बांगडया, कडा, अंगठ्या , कानातील लटकन, टाॅप्स, झालर, कानातील बाळी, नथ, सोन्याचे बिस्कीट इ. असा एकूण 859 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजन व रोख रक्कम 10 हजार 160 रू असा एकूण 35 लाख 26 हजार 160 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि गुंजवटे हे करीत आहे.सदर आरोपी हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल असून तसेच मंगळवेढा पोलीस ठाणे येथे वाळू चोरीचे व दारू बंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोनि रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोह.,नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय जगदाळे,मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गुंजवटे व त्यांचा पथकाने बजावली आहे.
पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवून अवघ्या काही दिवसातच अवताडे यांच्या घरात भरदिवसा लाखोंची चोरी करणाऱ्यास जेरबंद केल्यामुळे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे मोठे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.



0 Comments