आनंदाची बातमी! कोरोना लस सोलापुरात दाखल, पहिल्या टप्प्यात ‘या’ लोकांना मिळणार लस
अवघ्या देशवासीयांचे आणि सोलापूरकरांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर बुधवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोलापुरात दाखल झाली.
सोलापुरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. सोलापुरात ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
१६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्याबाबत राज्य आयोग विभागाने निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य विभाग लसीकरण करण्यासाठी सज्ज झाला आहे
शहर आणि जिल्ह्यात अठरा बूथ निश्चित करण्यात आले आहेत. या बूथवरून प्रत्यक्ष लसीकरण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीकरणासाठी पुण्यातून बुधवारी लस घेऊन गाडी सोलापुरात दाखल झाली..
सिव्हिल हॉस्पिटलमधून संबंधित बूथवर ही लस १६ जानेवारी रोजी निर्धारित केलेल्या वेळेत पोहोचवली जाईल. लसीकरणासाठी लागणारी सर्व साधनसामग्री लवकरच केंद्रावर पोहोच करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची गडबड सुरू असतानाच आता आरोग्य विभागात लसीकरणाची घाई सुरू झाली आहे. पोर्टलवर नोंद असलेल्या ३८ हजार आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना पहिल्या टप्प्यातच लस देण्यात येणार आहे. लस दाखल झाल्यानंतर पुढील नियोजन वेगाने होणार आहे.
लस असणार ऐच्छिक
कोरोना लस सर्वांना ऐच्छिक असणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असल्यामुळे ही लस सर्वांनीच घ्यावी, असा आग्रह धरला जाणार आहे. लस सुरक्षित असल्याने कोरोना प्रतिबंधासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.
प्रमुख डॉक्टर घेणार प्रथम लस
कोरोनाची लस सुरक्षित आहे, याची खात्री सर्वांना पटावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन व प्रमुख अधिकाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणास प्रारंभ केला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले.


0 Comments