सांगोला : २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सांगोला तालुक्यातील तब्बल ३४ गावातील निवडणूक लढविलेल्या व निवडून आलेल्या ७०३ जणांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब निवडणूक विभागाला दिला नसल्याने निवडणूक आयोगाने कारवाईचा निर्णय घेत त्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरवले आहे .
ग्रामपंचायतीची चालू निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार अपात्र झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली असून या निर्णयामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . अनेक इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत . मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १ ९ ५८ चे कलम १४ ( ब ) अन्वये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल केलेले तसेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी निकाल जाहीर केलेल्या दिनांका पासून एक महिन्याच्या आत निवडणूक खर्च विहित वेळेत व विहित रीतीने संबंधित निवडणूक अधिकारी अथवा सक्षम अधिकार्याकडे सादर करावा लागतो . मात्र सांगोला तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ७०३ उमेदवारांनी आपल्या निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगास वेळेत सादर केला नाही . त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी सादर केली होती . यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा निर्णय घेत निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केलेल्या उमेदवारांनापुन्हा निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरवले आहे . त्यामुळे आपापल्या गावातील कोणता सदस्य निवडणूक लढवण्यास अपात्र आहे याची चर्चा सुरू आहे . सन २०१५ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ३४ गावातील उमेदवारी अर्ज दाखल केलेले व निवडून आलेल्या सदस्यांनी निवडणुकीचा खर्च सादर केला नाही अशा उमेदवारांची गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे खिलारवाडी १० , कमलापूर १६ , शिरभावी २ , अचकदाणी २६ , भोपसेवाडी २३ , बुरंगेवाडी २५. डोंगरगाव १८ , धायटी १८ , वाटंबरे ७ . जुजारपूर २८ , जुनोनी ३० , हंगिरगे १५ , लोणविरे २२ , हणमंतगाव ११ , अजनाळे २८ , बुद्देहाळ १२ , इटकी १२ , मानेगाव ७ , वाकी शिवणे २२ , हातीद २८ , हटकर मंगेवाडी ६. जवळा २ , कटफळ २१ , गौडवाडी ३१ , अकोला ४ , राजुरी १० , महूद ५६. लक्ष्मीनगर ९ , पारे ५ , कडलास ४७ , लोटेवाडी १८ , किडेबिसरी १ , कोळा ५६ , यलमार मंगेवाडी १३ अशा ३४ गावातील ७०३ जण चालू ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत .


0 Comments