पत्नीच्या व सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ; सांगोला तालुक्यातील घटना !
सांगोला ( विषेश प्रतिनिधी ) : पोलीस ठाण्यात दाखल केलेली केस मिटवून घेण्यासाठी १० लाख रुपये देण्याचा तगादा लावत पत्नीसह सासरच्या मंडळींनी पतीला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली . तसेच पत्नी , सासू , सासरा , मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्या या त्रासामुळे व सततच्या पैशाच्या मागणीच्या त्रासाला कंटाळून स्वप्नील उत्तम शिरदाळे वय ३६ रा . सरगरवाडी नाझरा ता . सांगोला याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताची पत्नी पूजा स्वप्निल शिरदाळे , सासू कस्तुराबाई मल्लिकार्जुन बुरकुल , सासरा मल्लिकार्जुन तुकाराम बुरकुल , मेव्हणा तुकाराम मल्लिकार्जून बुरकुल सर्व रा . आंधळगाव ता . मंगळवेढा तसेच पत्नीचा मामा चंदू पाटील रा.धर्मगाव ता . मंगळवेढा यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी , सप्टेंबर २०१८ ते २ नोव्हेंबर २०२० पर्यंत सरगरवाडी , नाझरा ता . सांगोला येथील स्वप्निल उत्तम शिरदाळे यास पत्नी पूजा शिरदाळे , सासू कस्तुराबाई बुरकुल , सासरा मल्लिकार्जुन बुरकुल , मेव्हणा तुकाराम बुरकुल सर्वजण रा . आंधळगाव ता.मंगळवेढा पत्नीचा मामा चंदू पाटील रा.धर्मगाव ता . मंगळवेढा हे वारंवार संगनमत करून स्वप्निल यास धमकी देत होते . तसेच त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या केसेस मिटवून घेण्यासाठी स्वप्नील शिरदाळे याच्याकडे वरील सर्वांनी १० लाख रुपये देण्याचा तगादा लावला होता . तसेच त्यांनी पैसे आण नाहीतर तुला व तुझ्या मुलीला मारून टाकतो असे धमकी दिली होती . पत्नी , सासू , सासरा , मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्या शारीरिक , मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून स्वप्नील उत्तम शिरदाळे याने २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निल याने आईच्या मोबाईलवर माझी बायको पूजा , सासू , सासरा , मेहुणा व बायकोचा मामा चंदू पाटील यांच्या त्रासाला व सततच्या पैशाच्या मागणीमुळे मी आत्महत्या करीत आहे तसेच माझ्या मृत्यूस जबाबदार आहेत असा मेसेज पाठवला . तसेच सदरचा मेसेज त्याने मित्रांच्या मोबाईलवर देखील पाठवला . याप्रकरणी मयताचा भाऊ प्रकाश शिरदाळे राहणार सरगरवाडी नाझरा यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी , सासू , सासरा , मेहुणा व पत्नीचा मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .


1 Comments
लोक कोरोनाला न घाबरता इजतीला लय जपून राहिले. जो तो उठतो आत्महत्या करतो.इज्जत आब्रु लय महत्त्वाची झालीया कोरोनापेक्षा.
ReplyDelete