आमदार भारत (नाना) भालकेंचे निधनाने , कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर ; आज सरकोली येथे अंत्यविधी !
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत (नाना) भालके यांचे निधन झाले आहे , ते ६० वर्षांचे होते . पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला . भारत नाना भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती , काही दिवसांतच कोरोनावर मात करुन ते घरी परतले .मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .
शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली . काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे . रूबी हॉल क्लिनिक बाहेर त्यांच्या प्रकृतीबद्दलचे पहिले मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले होते . त्यानंतर , कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी बा विठ्ठलाकडे प्रार्थना केली . सोशल मीडियातून त्यांच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा करण्यात आला होता . अखेर , भारत नानांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली .
भारत भालके यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये येउन आमदार भालके यांना पाहिले . तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती घेतली . त्याचवेळी रूपाताई चाकणकर यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली .दरम्यान साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली होती . आ . भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे , ते व्हेंटिलेटरवर आहेत तथापि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .
या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी झाली . पंढरपुरातूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची झुंबड रुबी हॉलच्यासमोर उडालेली दिसत आहे . मात्र , त्यांच्या निधनाचे वृत्त झळकल्याने कार्यकर्त्यांवर दु : खाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयाबाहेरच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे . सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .


0 Comments