सोलापूर जिल्हयात अवैध धंदयाविरूध्दच्या कारवाईत एकाच दिवशी 13 लाख 53 हजाराचा मुद्देमाल हस्तगत !
by shabdhrekha express news on October 30, 2020 in तालुका प्रतिनिधी

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना अवैध धंदयाविरूध्द कारवाईचे काढले फर्मान.....
सोलापुरः(मंगळवेढा प्रतिनिधी) सोलापूर जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नव्याने कार्यभार स्विकारलेल्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना अवैध धंदयाविरूध्द कारवाई करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. दरम्यान, जिल्हयातील 25 पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी अवैध दारू विक्री व जुगार खेळणार्याविरूध्द कारवाईची मोहिम करून 13 लाख 53 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा जिल्हयात डॅशिंग महिला पोलिस अधिकारी अशी ओळख असलेल्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर येथे पोलिस अधिक्षकपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे समूळ नष्ट करणे गरजेचे असल्याने त्यांनी जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना अवैध धंदयावर कारवाईच्या सक्त सूचना दिल्या. त्याप्रमाणे बुधवार दि. 28 रोजी जिल्हयातील 25 पोलिस ठाण्यांतर्गत कारवाईची मोहिम पोलिस दलाकडून राबविण्यात आली. यामध्ये एकाच दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणार्या 161 आरोपीविरूध्द 169 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 11 लाख 13 हजार 390 इतका किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबरोबर जुगार खेळणार्या 71 आरोपीविरूध्द 48 गुन्हे दाखल करून 2 लाख 40 हजार 540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही घटनेमध्ये पोलिसांनी जवळपास एकाच दिवशी 13 लाख 53 हजार 930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू विक्रीमध्ये मानवी शरीरास गुळमिश्रीत रसायनामध्ये युरिया व नवसागरचा वापर करणार्या व्यवसायिकांविरूध्द भा.दं.वि.328 हे कारवाईसाठी प्रभावी कलमाचा वापर करण्यात आला आहे. जिल्हयामध्ये एकाच दिवशी प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्यामुळे अवैध धंदे करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून या कारवाईची मोहिम पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात यापुढेही चालू राहणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
आपल्या परिसरात अथवा आजूबाजूस अवैध धंदे सुरु असल्यास नागरिकांनी 0217/2732010 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती दयावी,माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.



0 Comments