सांगोल्यातून सिलीगुडीकडे निघाले १६ लाखांचे डाळिंब; ट्रक गंतव्यस्थळी पोहोचण्याआधीच गायब १,१८२ बॉक्समध्ये भरलेला १२ टन माल; दोन चालकांवर अपहाराचा आरोप, सांगोला पोलिसांत तक्रार
सांगोला,: सांगोल्यातून पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे पाठविण्यात आलेला सुमारे १६ लाख रुपये किमतीचा १२ टन डाळिंबाचा माल गंतव्यस्थळी पोहोचण्यापूर्वीच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी ट्रक चालकांनी मालाची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याचा आरोप करीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार अनिल मधुकर विभुते (वय ३९, रा. ब्रह्मचैतन्य नगर, सांगोला) यांचा महूद रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपासमोर ए.व्ही. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत शेतकरी व व्यापाऱ्यांचा माल विविध राज्यांमध्ये वाहतूक केला जातो.
तक्रारीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी आदर्श ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक, मुशिराबाद यांच्या माध्यमातून आयशर ट्रक क्रमांक UP 58 AT 3782 सांगोल्यात आला होता.
या ट्रकमधून सिलीगुडी येथील व्यापारी लालुभाई यांच्याकडे डाळिंब पाठविण्याचे ठरले होते. त्यासाठी सांगोला ते सिलीगुडी वाहतुकीचे १ लाख १५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले.
२१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ट्रकमध्ये १,१८२ डाळिंबाचे बॉक्स भरून बिल्टी क्रमांक १२९५ तयार करण्यात आली.
चालकाला ३० हजार ८०० रुपये रोख आगाऊ देण्यात आले, तर वाहनासाठी १९ हजार २०० रुपयांचे डिझेल भरण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता ट्रक सिलीगुडीच्या दिशेने रवाना झाला.
मात्र नियोजित वेळेत माल सिलीगुडीला न पोहोचल्याने संशय निर्माण झाला. २३ सप्टेंबर रोजी सिलीगुडी येथील व्यापाऱ्याने संपर्क साधून माल अद्याप मिळाला नसल्याचे कळविले.
त्यानंतर चालक कमलेश सुरेंद्र राजभर आणि पंचांग दास यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही मोबाईल क्रमांक बंद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ट्रकच्या टोल नोंदी तपासल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पारगाव-श्रीगोंदा, २२ सप्टेंबर रोजी भोपाल-विदिशा आणि २५ सप्टेंबर रोजी गोरखपूर येथील भिताहा टोल प्लाझा अशा नोंदी आढळल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
ट्रक मालकाशी संपर्क साधल्यानंतर वाहन बनारस येथील वित्तीय कंपनीच्या यार्डमध्ये जमा असल्याची माहिती मिळाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र ट्रकमधील डाळिंबाचा माल नेमका कुठे गेला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
सुमारे १२ टन डाळिंबाची किंमत १६ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सिलीगुडी येथील व्यापाऱ्याकडे माल सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात
आल्यानंतर तो गंतव्यस्थळी न पोहोचविता परस्पर विल्हेवाट लावून अपहार व फसवणूक केल्याचा आरोप कमलेश सुरेंद्र राजभर आणि पंचांग दास यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी सांगोला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, माल नेमका कुठे गेला, त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली आणि या प्रकरणात
आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तपासानंतरच संपूर्ण प्रकरणाचे वास्तव समोर येणार आहे.


0 Comments