शहाजीबापूंच्या विधानाने चिवटेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह! ‘आमचा पाठिंबा शिवसेनेला; मंगेश चिवटेंना नाही’ — शहाजीबापू पाटील यांचे स्पष्ट वक्तव्य
सांगोला : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावरून राजकीय वातावरण तापले असतानाच
सांगोल्याचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांना शहाजीबापू पाटील यांनी थेट पाठिंबा नाकारला आहे.
“पुणे शिक्षक मतदारसंघात आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, मंगेश चिवटे यांना नाही,”
असे स्पष्ट विधान शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा केला जात असताना भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.
चिवटे यांनी मात्र आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.
मंगेश चिवटे यांनी या निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती.
मात्र, महायुतीच्या जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यांच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांनी पक्षाच्या निर्णयालाच प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.
“ही जागा आमच्या पक्षाला मिळायला पाहिजे होती. मात्र ती मिळाली नाही. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार आम्ही काम करू,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
विशेष म्हणजे, “मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज भरणार आहेत की नाहीत, हे मलाच माहिती नाही,” असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी चिवटेंच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही संभ्रम निर्माण केला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून चिवटे स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्यास शिवसेनेतील वरिष्ठ नेते त्यांच्यामागे उभे राहणार का, हा आता महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपने शिक्षक मतदारसंघासोबतच पुणे पदवीधर मतदारसंघासाठीही उमेदवार जाहीर केल्याने महायुतीतील इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहाजीबापू पाटील यांच्या “शिवसेनेला पाठिंबा, चिवटेंना नाही” या विधानामुळे मंगेश चिवटे यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे आता विशेष लक्ष लागले असून, ते प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


0 Comments