दुष्काळ पाहणीला गेलेल्या पालकमंत्र्यांसमोर हिरवीगार शेती! महूदमधील पाहणीसाठी निवडलेल्या शेतात पिकांची बहरलेली स्थिती; पाहणीचा मार्ग बदलण्याची नामुष्की
सांगोला : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यादरम्यान महूद येथे प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला.
दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाने निवडलेल्या शेतात पालकमंत्री पोहोचले असता, तेथे दुष्काळाच्या खुणांऐवजी हिरवीगार आणि बहरलेली पिके दिसून आली.
सांगोला तालुक्यातील अनेक भाग दुष्काळाच्या झळा सोसत असताना शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यात महूद परिसरातील एका शेताची पाहणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील पिकांची परिस्थिती पाहून नियोजित पाहणीचा उद्देशच वेगळा असल्याचे चित्र निर्माण झाले.
हिरवळ पाहून प्रशासनाची धावपळ
पालकमंत्र्यांसमोरच निवडलेल्या शेतात पिके चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त शेताऐवजी बहरलेली शेती दाखवली गेल्याने प्रशासनाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले.
यानंतर नियोजित शेतातील पाहणी न करता पालकमंत्र्यांचा ताफा दुसऱ्या शेताकडे वळविण्यात आला. तेथे प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
शेताची निवड नेमकी कशी झाली?
या घटनेमुळे कृषी विभागाने पाहणीसाठी शेताची निवड कोणत्या निकषांवर केली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दुष्काळ पाहणीसाठी प्रशासनाकडून योग्य माहिती
घेऊनच ठिकाण निश्चित केले जाते का, असा सवालही शेतकरी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुष्काळाची तीव्रता प्रत्यक्ष शेतात दिसत असताना पाहणीसाठी योग्य शेताची निवड न होणे ही बाब प्रशासनासाठी निश्चितच विचार करण्यासारखी आहे.
भविष्यात अशा दौऱ्यांमध्ये प्रत्यक्ष नुकसानग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांच्या शेतांचीच निवड करून वस्तुस्थिती प्रशासनासमोर आणावी, अशी मागणी आता होत आहे.
दरम्यान, महूद येथील या प्रकारामुळे दुष्काळ पाहणीच्या नियोजनावरून कृषी विभागाच्या कार्यपद्धतीची चर्चा रंगली असून,
संबंधित शेताची पाहणीसाठी निवड नेमकी कशाच्या आधारे करण्यात आली होती, याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments