तिसंगी, सोनके व चिंचोली तलावांसाठी पाण्याचा मार्ग मोकळा १५ ऑक्टोबरपर्यंत मोठ्या विसर्गाने तलाव भरण्याची अपेक्षा; दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला प्रतिनिधी : सांगोला विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तिसंगी, सोनके
आणि चिंचोली तलावांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे.
हे तलाव १५ ऑक्टोबरपर्यंत मोठ्या विसर्गाने पूर्ण क्षमतेने भरावेत, यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन
सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
तिसंगी, सोनके परिसरातील शिष्टमंडळाच्या उपस्थितीत तलावांमध्ये पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली.
सांगोला तालुक्यात पावसाची अनिश्चितता आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अशा परिस्थितीत उपलब्ध जलस्रोतांमध्ये पाणी आणण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची
भूमिका आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली आहे.
तिसंगी, सोनके आणि चिंचोली तलाव भरल्यास परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
तलावांमध्ये मोठ्या विसर्गाने पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी
केलेल्या पाठपुराव्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


0 Comments