दुष्काळाच्या झळा, अवकाळीचा तडाखा; शेतकऱ्यांना सरसकट मदत कधी? शशि हातेकरांचा शासनाला सवाल;
कोळे, जुनोनीसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी
सांगोला विशेष प्रतिनिधी : सातत्याने दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी यंदाही कमी झालेल्या नाहीत.
पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे.
कोळे व हातीद सर्कलमधील विविध गावांमध्ये डाळिंब बागांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अनिश्चित दर आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे
शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
या पार्श्वभूमीवर कोळे, जुनोनी, गौडवाडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ आणि करांडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान सरसकट देण्यात यावे,
अशी मागणी गौडवाडीचे युवा नेते शशि हातेकर यांनी शासनाकडे केली आहे.
नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना केवळ निवडक गावांचा किंवा काही शेतकऱ्यांचा विचार न करता संपूर्ण परिसरातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी.
पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचा लाभ वेळेत मिळावा, अशी मागणी हातेकर यांनी केली आहे.
तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिके, डाळिंब बागा व अन्य फळबागांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज’
“शेतकरी वर्षभर कष्ट करून पिके घेतो. मात्र पाऊस, दुष्काळ आणि अवकाळी अशा नैसर्गिक संकटांमुळे त्याच्या हातचे उत्पन्न हिरावले जाते.
त्यामुळे शासनाने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळी अनुदान वेळेत द्यावे. अवकाळी
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांनाही तातडीने आर्थिक मदत मिळावी,” अशी मागणी शशि हातेकर यांनी केली.


0 Comments