Breaking News

शिक्षण, रोजगार आणि कौशल्यविकासाला नवी दिशा; डॉ. अनिकेत देशमुख यांचा वाढदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा

शिक्षण, रोजगार आणि कौशल्यविकासाला नवी दिशा; डॉ. अनिकेत देशमुख यांचा वाढदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा


सांगोला : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा आणि उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी, या उद्देशाने सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

 तथा युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्यविकास उपक्रमांच्या माध्यमातून ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसह युवक-युवती आणि नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा, रोजगार मेळावा,

 कॅम्पस ड्राइव्ह, कौशल्यविकास प्रशिक्षण, मशरूम शेती कार्यशाळा, राष्ट्रीय परिषद तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मेरिट स्कॉलरशिप अशा उपक्रमांचा समावेश आहे.

‘प्रेरणा दिना’च्या निमित्ताने 27 सप्टेंबर रोजी सांगोला तालुका मर्यादित बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा व कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विविध नामांकित कंपन्या व बँका सहभागी होणार आहेत.

युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य मिळावे यासाठी 3 ऑक्टोबर रोजी 40 दिवसीय सहाय्यक इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण कोर्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

 तर 5 ऑक्टोबर रोजी ‘मशरूम शेती व व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. आळंबीच्या सेवनाचे शास्त्रीय व वैद्यकीय महत्त्व या विषयावर 6 व 7 ऑक्टोबर रोजी द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वर्गीय डॉ. गणपतरावजी देशमुख मेरिट स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे. 

तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने रंगभरण, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

3 ऑक्टोबरला पारितोषिक व गौरव समारंभ

या सर्व उपक्रमांचा पारितोषिक व गौरव समारंभ शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास कमलापूर येथील 

शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे (बी.एड.) प्राचार्य डॉ. सर्जेराव (साजिकराव) पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सत्कारमूर्ती डॉ. अनिकेतभैय्या देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

वाढदिवसाला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा, युवकांना कौशल्य व रोजगाराची संधी आणि गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवून ‘प्रेरणा दिन’ साजरा करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे.

 या उपक्रमांमध्ये तालुक्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शंकर धसाडे व उपमहाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. केशव माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments