सांगोला बाजार समितीची आर्थिक भरारी; तब्बल १ कोटी ८३ लाखांचा विक्रमी नफा वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; शेतकरी, व्यापारी व घटकांची मोठी उपस्थिती
सांगोला प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोलाच्या आर्थिक प्रगतीला यंदा मोठी झेप मिळाली
असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेने तब्बल रु. १ कोटी ८३ लाख ४३ हजार ६७२ रुपयांचा नफा कमावला आहे.
बाजार समितीच्या इतिहासातील हा प्रथमच नोंदवला गेलेला विक्रमी वार्षिक नफा असल्याचे सभेत सांगण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, ३० जून २०२६
रोजी संस्थेच्या प्रशासकीय सभागृहात सभापती समाधान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार, आडते तसेच विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी बाजार समितीचे सचिव उत्तम राजाराम खोकले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
बाजार समितीच्या विकासासाठी शेतकरी, व्यापारी आणि संस्थेशी संबंधित सर्व घटकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
त्यानंतर लेखापाल महेंद्र मोहन वाघमारे यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा आर्थिक अहवाल सभेसमोर सादर केला.
त्यानुसार बाजार समितीला वर्षभरात ३ कोटी २० लाख ४८ हजार ५१३ रुपये उत्पन्न प्राप्त झाले,
तर १ कोटी ३७ लाख ४ हजार ८४१ रुपये खर्च झाला. उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद पाहता संस्थेला १ कोटी ८३ लाख ४३ हजार ६७२ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे स्पष्ट झाले.
या विक्रमी आर्थिक कामगिरीमुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे सभेत अधोरेखित करण्यात आले.
नफ्याच्या या आकडेवारीचे उपस्थितांकडून समाधानाने स्वागत करण्यात आले.
सभापती समाधान पाटील यांनी आपल्या मनोगतात बाजार समितीच्या प्रगतीमध्ये सर्व घटकांचे योगदान असल्याचे सांगितले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगतीची वाटचाल सुरू असून,
बाजार समितीतील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपसभापती माणिकचंद वाघमारे यांच्यासह संचालक मंडळातील विनायक कुलकर्णी, आबासाहेब आलदर, धनाजी पवार, रामचंद्र बाबर, अमजद बागवान,
अमोल खरात, किशोर शिंदे, दिपक गोडसे, संतोष देवकाते, विष्णु सरगर, दगडू गावडे,
हेमंतकुमार शिंदे, बाळासो काटकर, चंद्रकांत करांडे, सौ. शोभा पवार, श्रीमती प्रमिला चौगुले आदी उपस्थित होते.
सभेत विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर चर्चा करून कामकाज पूर्ण करण्यात आले. अखेरीस सभापती समाधान पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शांतता, सुव्यवस्था आणि उत्साहपूर्ण वातावरणात सभा संपन्न झाली.
बाजार समितीच्या इतिहासातील विक्रमी नफ्यामुळे संस्थेच्या आर्थिक वाटचालीबाबत शेतकरी,
व्यापारी आणि बाजार समितीशी संबंधित घटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 Comments