Breaking News

५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; दीड महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा मृतदेह विहिरीत; DNA अहवालाने उघडले खुनाचे गूढ, ५५ वर्षीय महिला अटकेत

५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; दीड महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा मृतदेह विहिरीत; DNA अहवालाने उघडले खुनाचे गूढ, ५५ वर्षीय महिला अटकेत


पंढरपूर | प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथे प्रेमसंबंधातून झालेल्या खुनाची धक्कादायक घटना

 तब्बल दीड महिन्यानंतर उघडकीस आली आहे. ७० वर्षीय अंबादास संतराम खांडेकर यांची धारदार हत्याराने हत्या करून

 मृतदेह अर्धवट जाळण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

 या प्रकरणी गावातीलच ५५ वर्षीय मंगल श्रीमंत होनमाने हिला पोलिसांनी अटक केली आहे.

अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.

 कुटुंबीयांनी दोघांनाही संबंध तोडण्याबाबत समजावून सांगितले होते.

२७ जुलैला घरातून गेले अन् परतलेच नाहीत

२७ जुलै २०२६ रोजी सकाळी आठच्या सुमारास अंबादास हे मुलीकडे शेंडगे वस्तीवर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले.

 मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर ३० जुलै रोजी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, २ ऑगस्ट रोजी अंबादास यांच्या कुटुंबीयांना मंगल होनमाने हिच्या घरासमोर उसाचे

 पाचट आणि साडी जळाल्याचे दिसून आले. संशय बळावल्याने परिसरात शोध घेतला असता शंकरगावातील भालचंद्र कोता चंदनशिवे

 यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर कुजलेला आणि पाठीमागील बाजूने अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी DNA तपासणी

मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्याची ओळख तातडीने पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेहाचा DNA नमुना घेतला. 

त्याचबरोबर अंबादास यांच्या दोन मुली मैना शिवाजी पांढरे आणि जयश्री भीमराव येलगुंडे यांचेही DNA नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

तब्बल दीड महिन्यानंतर DNA अहवाल प्राप्त झाला आणि विहिरीत सापडलेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. 

अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १२ तासांत संशयित मंगल होनमाने हिला ताब्यात घेतले.

प्रेमसंबंधातील वादातून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा

पोलिसांच्या तपासानुसार, २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान प्रेमसंबंधातील वादातून मंगल होनमाने हिने अंबादास यांची धारदार हत्याराने हत्या केल्याचा आरोप आहे. 

त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरासमोर अर्धवट जाळून शेजारच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच मंगल होनमाने हिच्यावर संशय व्यक्त केला होता. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपी महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे व प्रशांत डगळे

 यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुरेश चिल्लावर, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले आणि त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments