Breaking News

पंढरपूरच्या प्रशासकीय नकाशावर मोठी भर; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनाची मंजुरी

पंढरपूरच्या प्रशासकीय नकाशावर मोठी भर; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनाची मंजुरी


पंढरपूर | प्रतिनिधी : पंढरपूरसह परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय झाला

 असून, पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 

महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या कार्यालयासाठी मुख्यमंत्री तसेच महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पंढरपूरला स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सात तालुके पंढरपूरच्या कार्यक्षेत्रात

नव्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढा या सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक जिल्हास्तरीय महसूल कामांसाठी सोलापूरला जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.

दरम्यान, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट हे चार तालुके सोलापूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहेत.

कार्यालयासाठी तात्पुरती जागा; कायमस्वरूपी इमारतीचा प्रस्ताव

शासन निर्णयानुसार नव्या कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची पदस्थापना शासन स्तरावरून करण्यात येणार आहे. 

इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून केली जाणार आहे.

कार्यालय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरती जागा निश्चित केली जाणार असून, त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा शोध घेऊन

 कार्यालयाच्या इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाठपुराव्याला अखेर यश

पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर व्हावे यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूल सचिव विकास खारगे यांची भेट घेऊन शासन निर्णय तातडीने जारी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने हा निर्णय जाहीर केला.

पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मिळाल्यामुळे सात तालुक्यांतील नागरिकांसाठी महसूल प्रशासन अधिक सुलभ आणि जवळचे होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

या निर्णयाबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार,

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments