गायत्रीने ते वाक्य उच्चारताच पतीचा पारा चढला, रागाच्या भरात जीव घेतला अन् उसात जाऊन निवांत झोपला; सोलापुरातील धक्कादायक घटना
सोलापूर: दारूमुळे होणाऱ्या कौटुंबिक वादांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्यास विरोध करत 'तुम्ही दारू प्यायलात तर मी आईकडे निघून जाईन,'
असा पवित्रा पत्नीने घेतल्यानंतर क्रूर पतीने धक्कादायक पाऊल उचललं.पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून पतीने कोयता आणि विटेने हल्ला करून पत्नीचा खून केला.
ही घटना कुरुल (ता. मोहोळ) गावच्या शिवारात कुरुल ते कातेवाडी रस्त्यावरील एका वीटभट्टीवर घडली. गायत्री यशवंत हेगडे (वय २३, मूळ रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. कुरुल) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी पती यशवंत ऊर्फ अंबू भारत हेगडे याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंतने खून केल्यानंतर मोबाइल बंद केला आणि तो उसात जाऊन शांत झोपला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत गायत्री आणि आरोपी यशवंत हे दोघे कुरुल शिवारातील बिरू मोटे यांच्या वीटभट्टीवर कामाला होते.
२६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मयत गायत्री हिने आरोपी यशवंतला 'तुम्ही दारू प्यायलात तर मी आईकडे निघून जाईन' असे म्हटले.
याचा राग मनात धरून यशवंतने तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. 'तुझा जीवच घेतो' अशी धमकी देत त्याने वीट आणि ऊस तोडणीच्या कोयत्याने गायत्रीच्या डोक्यात, चेहऱ्यावर आणि डाव्या हातावर सपासप वार केले.
या हल्ल्यात गायत्रीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत काका कानिफनाथ हे उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेखा बालाजी हेगडे (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.
रेखा हेगडे व गायत्री या सख्या बहिणींचा विवाह हेगडे बंधूंसोबत झाला. गायत्री आणि यशवंत यांना एक लहान मुलगाही आहे. यशवंतला दारूचे व्यसन असल्यामुळे, सततच्या त्रासाला कंटाळून गायत्री काही महिन्यांपूर्वी
दोन महिने माहेरी निघून गेली होती. त्याचा यशवंतला प्रचंड राग होता, त्यातून हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी यशवंद हेगडे याला बेड्या ठोकत पुढील कारवाई सुरू केली आहे.


0 Comments