Breaking News

‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा; २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी एकजुटीचे आवाहन वाटंबरेतील सभेत सरकारवर जोरदार टीका; ‘समाजावर अन्याय झाला तर गप्प बसणार नाही’

‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा; २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी एकजुटीचे आवाहन वाटंबरेतील सभेत सरकारवर जोरदार टीका; ‘समाजावर अन्याय झाला तर गप्प बसणार नाही’


सांगोला : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी वाटंबरे (ता. सांगोला) येथील जाहीर सभेत सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘होय, आम्ही कट्टर हिंदू आहोत; 

मात्र आमचे हिंदुत्व छत्रपती शिवरायांचे आहे. हिंदू कोणाच्या बापाची जागीरदारी नाही,’ असे ठणकावून सांगत त्यांनी सामाजिक प्रश्नांवर सरकारला थेट इशारा दिला.

वाटंबरे येथे आयोजित सभेला उशीर झाला असतानाही मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती. सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये जरांगे-पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

‘समाजासाठी संघर्ष करणे हे माझे कर्तव्य’

सभेत बोलताना जरांगे-पाटील यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. ‘समाजासाठी संघर्ष करणे हे माझे कर्तव्य आहे.

 विनाकारण आम्ही कोणाचे नाव घेत नाही; मात्र आमच्या वाट्याच्या आडवे कोणी आले तर आम्ही त्याला सोडतही नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘अन्याय झाला तर समाज गप्प बसणार नाही’

समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू असल्याचा आरोप करत जरांगे-पाटील यांनी अन्यायाविरोधात समाज एकत्रितपणे उभा राहील,

 असा इशारा दिला. ‘अन्याय झाल्यानंतर मराठा समाज एकजुटीने उभा राहतो, हे यापूर्वीही दाखवून दिले आहे,’ असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, धनगर आरक्षण, बंजारा समाजाचे प्रश्न तसेच मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांचाही उल्लेख केला. 

सर्व समाजांनी आपापल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करत, समाजाची एकजूट कायम राहिली तर सरकारची सत्तेची मग्रुरी उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

२९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन

आगामी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने आणि एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी संघटित राहण्याचा संदेश त्यांनी दिला.

सांगोल्यात सर्व समाजांच्या वतीने स्वागत

वाटंबरे येथील सभेसाठी जात असताना सांगोला शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी जरांगे-पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

कडलास नाका येथे मुस्लिम समाजासह विविध समाजांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत बहुजन समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी विविध समाजांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाटंबरेतील या सभेतून मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडत आगामी आंदोलनासाठी समाजाला एकजुटीचा संदेश दिला.

Post a Comment

0 Comments