सांगोल्यात शाळा-कॉलेज परिसरात रोडरोमिओंचा त्रास वाढला; निर्भया पथकाच्या सक्रियतेची पालकांची मागणी
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; शाळा, महाविद्यालये व क्लासेस परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज
सांगोला : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शहरासह तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र, शाळा व क्लासेसच्या परिसरात तसेच ये-जा करण्याच्या मार्गावर
काही तरुणांकडून विद्यार्थिनींची छेडछाड, विनाकारण पाठलाग किंवा त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पालक व विद्यार्थिनींकडून पुढे येत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विशेषतः शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत प्रमुख रस्ते, चौक तसेच खासगी क्लासेसच्या परिसरात पोलिसांची नियमित गस्त असणे आवश्यक असल्याची मागणी पालकांकडून होत आहे.
विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची भूमिका महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसना नियमित भेटी देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे तसेच संशयास्पदरीत्या परिसरात फिरणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेवणे, यामुळे अशा प्रकारांना आळा बसू शकतो.
ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींचीही मोठी संख्या
सांगोला शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात.
सकाळी शाळा-कॉलेजला जाताना तसेच सायंकाळी घरी परतताना त्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. या वेळेत पोलिसांची उपस्थिती वाढविल्यास पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.
प्रत्येक मोठ्या गावातही सुरक्षा यंत्रणा असावी
केवळ शहरापुरती मर्यादित न राहता तालुक्यातील मोठ्या गावांमधील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातही विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी शाळा-कॉलेज प्रशासन, पालक आणि विद्यार्थिनी यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विद्यार्थिनींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे यासाठी निर्भया पथकाने प्रत्यक्ष मैदानात सक्रिय राहून नियमित गस्त व जनजागृती करावी, अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.


0 Comments