सांगोल्यात गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश; सोनोग्राफी उपकरणासह मोबाईल जप्त गर्भलिंग निदानाची माहिती द्या, नाव राहणार गोपनीय; खबरीला मिळणार १ लाखांचे बक्षीस!
वाकी-शिवणे येथे धडक कारवाई; १५ हजारांत गर्भातील बाळाचे लिंग सांगितल्याचा आरोप, तिघांवर गुन्हा
सांगोला | प्रतिनिधी गर्भलिंग निदानास पूर्णपणे प्रतिबंध असतानाही सांगोला तालुक्यात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकी-शिवणे येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत
सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे उपकरण, मोबाईल, चार्जर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका समुचित प्राधिकारी तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना ५ ऑगस्ट रोजी या प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार संबंधित पथकाने पोलिसांच्या मदतीने वाकी-शिवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळील एका घरावर अचानक कारवाई केली.
कारवाईदरम्यान सुनिल संतोष शिंदे व पूजा सुनिल शिंदे (रा. तळसंगी, ता. मंगळवेढा) हे दाम्पत्य आढळून आले. प्राथमिक चौकशीत गर्भातील बाळाचे लिंग सांगण्यासाठी प्रत्येक तपासणीमागे १५ हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती समोर आल्याचे प्रशासनाने सांगितले.
या कारवाईत USG Probe, OPPO कंपनीचा मोबाईल, चार्जर आणि पॅकिंग केस आदी साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित ठिकाणी गर्भलिंग निदान करण्यासाठी आवश्यक
असलेले वैध PCPNDT नोंदणी प्रमाणपत्र किंवा कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासात आढळून आले.
जप्त करण्यात आलेले उपकरण प्रवीण पोपटराव देशमुख (रा. बारामती) यांचे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
त्यानंतर भास्कर रामचंद्र घाडगे, प्रवीण पोपटराव देशमुख आणि बापूराव किसवे यांच्याविरुद्ध गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय
अवैध गर्भलिंग निदान हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू
असल्याचे डॉ. गिराम यांनी स्पष्ट केले. तालुक्यात कुठेही गर्भलिंग निदानाचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, खरी माहिती देणाऱ्यास खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
माहितीसाठी संपर्क : १८००२३३४४७५ / १०४
गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही सजग राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments