Breaking News

घरफोड्या रोखण्यासाठी सांगोला पोलिसांचे नागरिकांना आवाहन; मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, संशयितांवर लक्ष ठेवा पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे

घरफोड्या रोखण्यासाठी सांगोला पोलिसांचे नागरिकांना आवाहन; मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, संशयितांवर लक्ष ठेवा पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यात घरफोड्या तसेच मालमत्तेविषयक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले आहे. 

घर बंद करून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गावातील धार्मिक, सामाजिक किंवा अन्य कार्यक्रमांच्या काळात अनेक नागरिक एकाच वेळी घरांना कुलूप लावून बाहेर पडतात. अशा वेळी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांकडून संधीचा फायदा घेतला जाण्याची शक्यता असते.

 त्यामुळे नागरिकांनी घरातील दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी अथवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ज्या नागरिकांना काही दिवसांसाठी घराबाहेर किंवा गावी जाणे आवश्यक आहे, त्यांनी आपल्या विश्वासू शेजाऱ्यांना याची माहिती द्यावी. 

घराच्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

गावात अनोळखी किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कारवाई न करता पोलिसांशी संपर्क साधावा. शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून संबंधित व्यक्तीचे छायाचित्र घेऊन

 पोलिसांना उपलब्ध करून द्यावे. तसेच अनोळखी व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गावाबाहेरील वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे. मालमत्तेविषयक गुन्ह्यांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती पोलिसांना गोपनीय पद्धतीने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून आपल्या परिसरातील सुरक्षितता वाढवावी. “सतर्क नागरिक — सुरक्षित समाज” या भावनेतून प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments