Breaking News

करांडे स्कूलमध्ये पत्रकारितेचा सन्मान सोहळा; ४७ पत्रकारांचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

करांडे स्कूलमध्ये पत्रकारितेचा सन्मान सोहळा; ४७ पत्रकारांचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद


सांगोला (प्रतिनिधी) : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करत सांगोला तालुक्यातील ४७ पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. 

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जुजारपूर येथील करांडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, ड्रीम फाउंडेशन सोलापूर, करांडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सांगोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व लेखक अभय दिवाणजी यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी बदलत्या पत्रकारितेचे स्वरूप, 

सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे निर्माण झालेली आव्हाने यावर भाष्य केले. बातमीचा वेग महत्त्वाचा असला तरी तिची सत्यता, अचूकता आणि विश्वासार्हता यांना सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके होते. पत्रकारांनी संस्थेच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीला समाजापर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात सांगोला विद्यामंदिर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

 त्यानंतर करांडे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. गणेश व सरस्वती वंदनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दांडपट्टा आणि मल्लखांबाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली.

निमंत्रक काशिनाथ भतगुणकी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून वैचारिक संवाद घडवून आणणे 

आणि समाजासाठी पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर पत्रकारांच्या वतीने मनोज उकळे यांनी मनोगत व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सांगोला तालुक्यातील ४७ पत्रकारांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे, म.सा.प. सांगोला शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रा. धनाजी चव्हाण, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप, म.सा.प. शाखेचे

 पदाधिकारी, करांडे कुटुंबीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व सुनील जावंजळ यांनी केले. आभार प्रा. धनाजी चव्हाण यांनी मानले.

चौकट : पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी नव्हे, तर समाजाची जबाबदारी

डिजिटल युगात माहितीचा वेग वाढला असला तरी पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवणे हे मोठे आव्हान आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे,

 घटनांमागील सत्य शोधणे आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणे ही प्रत्येक पत्रकाराची सामाजिक जबाबदारी असल्याचे अभय दिवाणजी यांनी सांगितले.

चौकट : ७५ वर्षांच्या ज्ञानयज्ञात पत्रकारांचे योगदान

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी वाटचालीत पत्रकारांनी संस्थेच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

 पत्रकारांच्या या योगदानाचा गौरव करता आला, ही आनंदाची बाब असल्याचे प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले.

Post a Comment

0 Comments