‘रक्ताचे नाते’ जपणाऱ्या महाराष्ट्राचा दिल्लीत गौरव; साडेसोळा हजारांहून अधिक रक्तवीरांचा राष्ट्रसेवेला सलाम सिंदूर महारक्तदान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत महाराष्ट्राच्या रक्तवीरांची विक्रमी कामगिरी
नवी दिल्ली : देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो रक्तवीरांनी पुढाकार घेतला.
तब्बल ४० तासांचा प्रवास करून दिल्ली गाठत रक्तदानाच्या माध्यमातून जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
‘सिंदूर महारक्तदान शिबिरा’नंतर नवी दिल्ली येथे आयोजित ‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना संबोधित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातील रक्तवीरांनी दाखविलेली राष्ट्रभक्ती ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
गतवर्षी या उपक्रमात सुमारे ९ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यंदा मात्र रक्तदात्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली असून साडेसोळा हजारांहून अधिक रक्तवीरांनी रक्तदान केले.
त्यामुळे हा उपक्रम केवळ रक्तदानाचा आकडा न राहता जवानांप्रती महाराष्ट्राच्या मनात असलेल्या आदर, कृतज्ञता आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक ठरला आहे.
जवानांसाठी महाराष्ट्राचे ‘रक्ताचे नाते’
सीमेवर देशासाठी रक्त सांडणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रातील नागरिकांनी रक्तदान करून त्यांच्याशी जुळवलेले हे ‘रक्ताचे नाते’ विशेष भावनिक आणि अभिमानास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महाराष्ट्रातील सर्व रक्तवीरांचे मनापासून अभिनंदन केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला
‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार आजही शिवसेनेच्या सामाजिक कार्याचा आधार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पैलवानांनीही दिला राष्ट्रसेवेला हातभार
‘डबल हिंदकेसरी’ तथा क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पैलवान आणि तरुणांनी या महारक्तदान मोहिमेत सहभाग घेतला.
आपल्या ताकदीचा आणि ऊर्जेचा उपयोग देशसेवेसाठी करणाऱ्या चंद्रहार पाटील यांच्यासह सहभागी झालेल्या सर्व पैलवानांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार संदिपान भुमरे, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, मिलिंद देवरा, डबल हिंदकेसरी तथा क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील, निवृत्त कर्नल मोहन काप्तिकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या हजारो रक्तवीरांनी दिलेला हा सहभाग म्हणजे देशरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना दिलेली अनोखी मानवंदना ठरली आहे.


0 Comments