घरपट्टीत दरवाढ नाही; मालमत्तेतील बदलामुळे काहींचा कर वाढला
नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांची माहिती; ३१ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला नगरपरिषदेच्या कर विभागाकडून चतुर्थ वार्षिक कर आकारणीचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला
असून, शहरातील एकूण १६ हजार ७७८ मालमत्ता इमारतींची नोंद करण्यात आली आहे.
त्यापैकी १३ हजार ६६ मालमत्तांच्या कर आकारणीच्या नोटिसा वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
मात्र, काही नागरिकांच्या मालमत्तांमध्ये बांधकाम अथवा वापरामध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या कराच्या रकमेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
घरपट्टीच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असे सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी स्पष्ट केले.
ज्या नागरिकांना अद्याप कर आकारणीची नोटीस मिळालेली नाही किंवा नोटीस मिळाल्यानंतर त्यांना कर आकारणीबाबत
काही तक्रार अथवा आक्षेप असल्यास, संबंधितांनी नगरपरिषदेच्या कर विभागाशी संपर्क साधून आपली हरकत नोंदवावी.
३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत हरकती अर्ज स्वीकारले जाणार असून, प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष माने यांनी दिली.
मालमत्तेतील बदलामुळे करात फरक
चतुर्थ वार्षिक कर आकारणीपूर्वी अनेक मालमत्तांमध्ये टॉयलेट, बाथरूम, जिना, पॅसेज तसेच खुल्या जागेचा कर आकारणीमध्ये समावेश केला जात नव्हता.
नवीन कर आकारणीमध्ये या बाबींचाही समावेश करण्यात आल्याने काही मालमत्तांच्या कराच्या रकमेत फरक पडला आहे.
याशिवाय काही नागरिकांनी मालमत्तेमध्ये वाढीव बांधकाम केले आहे किंवा रहिवासी पत्रा शेडचे गाळ्यांमध्ये रूपांतर करून वापरात बदल केला आहे.
अशा मालमत्तांच्या वापरातील बदल आणि वाढीव बांधकामाच्या आधारे कर आकारणी करण्यात आली आहे.
त्यामुळे कराची रक्कम वाढल्याचे दिसत असले तरी नगरपरिषदेने कराच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.
मालमत्तेच्या क्षेत्रफळात, बांधकामात किंवा वापरामध्ये झालेल्या बदलामुळे कराची रक्कम वाढली आहे, असे नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात
कर आकारणीबाबत शंका, तक्रार किंवा आक्षेप असलेल्या नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता
नगरपरिषदेच्या कर विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह हरकत नोंदवावी, असे आवाहन नगराध्यक्ष माने यांनी केले आहे.



0 Comments